मुंबई – भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातील ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाला काही सवाल केले. त्यांनी हे सवाल करताना नितीन गडकरी यांना लक्ष्य केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युतीच्या विरोधात काम केलेले आहे. अशा आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पाठिंबा घेण्यास शिवसेनेचा विरोध आहे असे सांगून त्यांचा पाठिंबा घेतल्यास आपल्यात आणि अरविंद केजरीवाल यांच्यात काय फरक राहिला असा सवाल त्यांनी केला.
मनसेचा पाठिंबा घेण्यास शिवसेनेचा ठाम विरोध
गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस इत्यादी सर्व नेते युतीमध्ये मनःपूर्वक काम करत असताना गडकरी यांनी युतीच्या भावनेच्या विरोधात जाऊन मनसेशी चर्चा केली. मग महाराष्ट्रात युतीचे अधिकार नेमके कोणाला आहेत हे एकदा भाजपाने ठरवावे असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले. काल रात्री ही युती मोडणार की काय अशी चर्चा सुरु झाली होती परंतु त्या चर्चेला उध्दव ठाकरे यांनी पूर्ण विराम दिला. युती मोडणार असल्याबद्दल ते काहीही बोलले नाहीत.
असे असले तरी त्यांनी भाजपासमोर काही प्रश्न टाकले आहेत आणि त्यांची उत्तरे आल्यानंतरच आपण पुढची भूमिका ठरवू असे सूचकपणे म्हटले आहे. मात्र भाजपा सेनेची युती टिकावी अशीच त्यांची भावना आहे. असे असले तरी मनसेला जवळ करण्यास ते अजिबात तयार नाहीत हे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आले.