दलबदलू वृत्तीला सर्वच जबाबदार

अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसैनिकांनी काल मारहाण केली. ते पक्षांतर करून कॉंग्रेसमध्ये गेले म्हणून शिवसैनिकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी राग दाटून आला होता. त्याचा स्फोट या प्रकारात झाला. शिवसेना-भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेरमध्ये वाकचौरे यांना रस्त्यातच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब वाकचौरे हे २००९ साली शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांना कॉंग्रेसच्याही लोकांनी मदत केली. कारण त्यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपाइं या आघाडीचे उमेदवार रामदास आठवले हे नको होते. आठवले यांनी शरद पवारांच्या आशिर्वादाने पंढरपूर मतदारसंघातून सतत दोन वेळा निवडणूक लढवून खासदारकी उपभोगली होती. परंतु पंढरपूर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर आठवले यांना शिर्डीत शिफ्ट करण्यात आले आणि तिथे त्यांचा पराभव करण्यात आला. भाऊसाहेब वाकचौरे निवडून आले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या युतीमध्ये आठवलेविरोधी भावना तयार झाली होती. त्यामुळे वाकचौरे यांचे फावले. पण आता २०१४ च्या निवडणुकीत ती हवा राहिलेली नाही. त्यामुळे आपण पुन्हा निवडून येऊ की नाही याविषयी त्यांच्या मनात शंका यायला लागली. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडून दिली आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

भारताच्या राजकारणामध्ये अशा संधीसाधू लोकांना जास्तच किंमत दिली जात आहे. खरे म्हणजे असे दलबदलू लोक हा भारताच्या राजकारणावरचा कलंक आहे. परंतु वाकचौरे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कॉंग्रेसने त्यांना पावन करून घेतले. कॉंग्रेसमधला प्रवेश आणि खासदारकीची उमेदवारी अशा दोन्ही घोषणा एकदम करून टाकल्या. कॉंग्रेसच्या नेत्यांना लोकशाहीवर भाषण करायला सांगितले तर ते छान भाषण करतील. नेहरू-गांधींच्या कॉंग्रेसने देशात लोकशाही कशी रुजवली आहे याच्या लंब्याचौड्या बाता करतील, परंतु प्रत्यक्ष व्यवहार करताना मात्र स्वार्थापोटी लोकशाहीही द्रोह करायला मागेपुढे पाहणार नाहीत. वाकचौरे यांना दिलेला कॉंग्रेस प्रवेश आणि लगेच जाहीर केलेली उमेदवारी हे कॉंग्रेसच्या निर्लज्जपणाचे लक्षणच आहे. वाकचौरे यांना सुद्धा आपण काही तरी पराक्रमच केला आहे असे वाटत होते आणि तेही दिमाखात फिरत होते. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने केवळ खासदारकीवर डोळा ठेवून शिवसेनेशी गद्दारी केली त्या पद्धतीने शिवसैनिक चिडलेले होते. त्यामुळे काल त्यांना संगमनेरमध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोपले. त्यांच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे कॉंग्रेसचेही कार्यकर्ते जमा झाले आणि मोठा तणाव निर्माण झाला.

शिवसेनेच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचा वाकचौरे यांच्यावरचा राग समजण्या सारखा आहे. कारण रात्रीतून पक्षनिष्ठा बदलणारे असे नेते घृणेचेच धनी आहेत. त्यांना असे रस्त्यात मारावे की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण वाकचौरे यांच्या श्रीमुखात भडकावणार्‍या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला अशी श्रीमुखात भडकविण्याचा अधिकार आहे का, याचा मात्र जरूर विचार केला पाहिजे. कारण वाकचौरे हे मुळात शिवसेनेचे नव्हते. ते २००९ सालच्या निवडणुकीत असेच एका रात्रीतून निष्ठा बदलून कॉंग्रेसमधून शिवसेनेत आले होते. तेव्हा त्यांची अशी निष्ठा बदलणे त्यावेळी शिवसेनेला चालले. आता मात्र हेच वाकचौरे निष्ठा बदलून शिवसेनेपासून दूर गेल्यास शिवसैनिकांत चीड निर्माण झाली आहे. शिवसेनेने रात्रीतून निष्ठा बदलणार्‍या किती लोकांना असे निष्ठेचे गंडे बांधले आहेत याचा हिशोब मांडावा. गेल्या पाच वर्षात मनसेतून सेनेत आणि सेनेतून मनसेत असे तळ्यात -मळ्यात करणारे किती कार्यकर्ते शिवसेनेचे गंडे बांधत आहेत याचीही यादी शिवसेनेने करावी. महाराष्ट्रातल्या मुंडे स्टाईल राजकारणामुळे भाजपात सुद्धा अशा किती तरी दलबदलूंना प्रतिष्ठेच्या जागा दिल्या गेल्या आहेत. मुंडेंनी रात्रीतून पक्षात आणलेले उदयनराजे, प्रतापसिंह मोहिते पाटील, रजनी पाटील अशा किती तरी लोकांनी लोकशाहीतल्या निष्ठा नावाच्या गोष्टीला हरताळ फासला आहे. सगळे एका माळेचे मणी आहेत.

सध्या राजकारणामध्ये निष्ठा नावाची काही गोष्टच राहिलेली नाही. पक्षनिष्ठाही राहिलेली नाही आणि जननिष्ठाही राहिलेली नाही. एखादा कार्यकर्ता पक्षाशी बांधिल असतो आणि तो जन्मभर पक्षाशी बांधिल राहतो. पक्ष बदलणे म्हणजे मोठी बेईमानी आहे अशी त्यांची भावना असते. म्हणून ते जन्मभर पक्षाला आणि विचाराला बांधलेले राहतात. सत्तेचा हव्यास बाळगत नाहीत. परंतु देशातले काही लोक पक्षाशी निष्ठा मोडून खाऊन रात्रीतून कोणत्याही पक्षात जातात. तो पक्ष समविचारी असेल तर काही हरकत नाही, परंतु टोकाच्या विरुद्ध विचाराच्या पक्षात जायला सुद्धा ते कचरत नाहीत. त्यांना विचाराशी काही देणेघेणे नसते. त्यांनी पक्षाशी द्रोह करून जनतेच्या हितासाठी अशी भूमिका बदलली तर एकवेळ तीही मान्य करता येईल, परंतु अशा टोपीबदलांमध्ये जनतेच्याही हिताची काही बाब गुंतलेली नसते. केवळ आमदार किंवा खासदारपद मिळावे एवढ्या एका संकुचित स्वार्थी हेतूने असे लोक रात्रीतून पक्ष बदलतात, निष्ठा बदलतात आणि लोकशाहीशी खिलवाड करतात.

Leave a Comment