राज्यात गारपिटीचा कहर सुरूच

औरंगाबाद – राज्यात पुन्हा एकदा गारपिटीने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले. गारपिटीमुळे बीडमध्ये तीन जणांचा बळी घेतला असून २० जण जखमी झाले. तर जळगावमध्ये एकाचा बळी गेला. गारपिटीच्या तडाख्याने शेतक-यांच्या हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. औरंगाबादमध्ये सतत सहाव्या दिवशी गारांच्या पावसाने धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात पुन्हा जोरदार पाऊस झाला.

नाशिक विभागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. विदर्भात नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांनाही गारपिटीचा तडाखा बसला. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा या तालुक्यांसह इतर ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक घरांची पडझड झाली असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पाऊस उसाला जरी पोषक असला तरी इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

पावसामुळे ऊसतोडणी रखडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मका, हरबरा, गहू यांसारख्या पिकांना पावसाचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बळीराजा चिंतेत आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांत गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सर्व भागांतून मागणी होत आहे. बारामती शहर व तालुक्याला रविवारी गारपिटीने तडाखा दिला. तालुक्यातील लोणी भापकर, काऱ्हाटी, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, फोंडवाडा, उंडवडी, माळवाडी, लोणी, बाबुर्डी, पानसरेवाडी, सोनपीरवाडी, देऊळगाव रसाळ, कारखेल, रसाळवाडी या भागात गारपिटीने झोडपले. त्यामुळे गहू, हरभरा, कडबा, ज्वारी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. बागायती भागात उसाच्या पिकाचे नुकसान झाले.

Leave a Comment