फ्लिपकार्ट १ अब्ज डॉलर्स विक्री गाठणार

मुंबई – अमेरिकन ऑनलाईन शॉपिंग अमॅझॉनला आव्हान देऊन सुरू करण्यात आलेल्या भारतीय फ्लिपकार्ट ऑनलाईन शॉपिंग साईटने या वर्षात १ अब्ज डॉलर्स म्हणजेच ६१०० कोटी रूपयांचा विक्रीचा टप्पा गाठला जाईल अशी खात्री व्यक्त केली आहे. कंपनीच्या पूर्वीच्या अंदाजानुसार हा टप्पा २०१५ मध्ये गाठणे अपेक्षित होते मात्र वर्षभर अगोदरच कंपनीला हे यश मिळते आहे. परिणामी फ्लिपकार्ट भारतातील सर्वात मोठी शॉपिंग पोर्टल ठरली आहेच व त्यामुळे भारतीय ई कॉमर्स मार्केटलाही तेजी अनुभवता येत आहे.

२००७ साली अॅमेझॉनमधून बाहेर पडलेल्या सचिन बन्सल आणि बिनी बन्सल यांनी ही कंपनी २०११ मध्ये स्थापन केली ती १० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करून. केवळ तीन वर्षात या कंपनीने विक्रीत १०० पट वाढ नोंदविली आहे. आणि आता ही खासगी कंपनी १ अब्ज डॉलर्स विक्रीचे उदिष्ट वर्षभर अगोदरच साध्य करण्याच्या मार्गावर आहे.

या कंपनीने ग्राहकांना दिलेली कॅश ऑन डिलिव्हरी योजना विक्री वाढण्यास अतिशय उपयुक्त ठरल्याचे जाणकारांचे मत आहे. भारतीय ग्राहक अजूनही ऑनलाईन शॉपिंगसाठी क्रेडीट कार्डाचे डिटेल्स देणे असुरक्षित समजतो. कांही जणांकडे क्रेडीट कार्डच नसते. मात्र या सर्व ग्राहकांना कॅश ऑन डिलिव्हरी सुविधेमुळे ऑर्डर देणे शक्य होतेच पण कंपनीचा माल ताब्यात आल्यानंतर पैसे देणे सुरक्षितही वाटते असे तज्ञांचे मत आहे.

फ्लिपकार्टने त्यांच्या व्यवसायाची सुरवात पुस्तक विक्रीतून केली होती आणि आज मोबाईल, टिव्ही, कॅमेरे, संगणक आणि सर्व प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू त्यांच्या साईटवर उपलब्ध आहेत.

Leave a Comment