फातिमा भुट्टो यांना साहित्य पुरस्कारासाठी नामांकन

लंडन- पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांची भाची फातिमा भुट्टो यांना ब्रिटनच्या बॅले वुमन्स प्राईज फॉर फिक्शन या सर्वोच्च साहित्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. अन्य १९ महिला साहित्यिकांनाही हे नामांकन मिळाले आहे. ब्रिटनमध्ये प्रकाशित होणार्‍या इंग्रजी कादंबर्‍यांसाठी महिला लेखिकांना हे पारितोषिक दिले जाते. ऑरेंज प्राईज या नावानेही ते ओळखले जाते.

फातिमा यांना द शॅडो आफॅ द क्रिसेंट मून या कादंबरीसाठी हे नामांकन मिळाले आहे. चार जून रोजी पुरस्कार विजेत्याची घोषणा केली जाणार असून ५० हजार डॉलर्स आणि कांस्य पुतळा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लंडनच्या रॉयल फेस्टीव्हल हॉलमध्ये हा सोहळा होणार आहे.

फातिमा या बेनझीर यांच्या कट्टर विरोधक आहेत. बेनझीर अतिशय सत्तालोलुप होत्या आणि त्यांचा भाऊ मूर्तिजा यांच्या हत्येतही त्यांचाच हात होता असा फातिमा यांचा आरोप आहे. मूर्तिजा यांची १९९६ साली हत्त्या झाली होती.