पुण्याच्या उमेदवारीवरुन काँग्रेस श्रेष्ठींची गोची

पुणे/विशेष प्रतिनिधी-लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पुण्यातील उमेदवारी बाबत मात्र काँग्रेस पक्षाच्या हायकमांडची गोची झाली आहे. दिीत झालेल्या खासदारांच्या मेजवानीत राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतील आर्थिक गैर व्यवहाराचा आरोप असलेले आणि त्यामुळे काँग्रेस पक्षातून निलंबित केलेले पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनाही स्थान मिळाले. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांना उमेदवारी देणे जरी शयय नसले तरी त्यांच्या पत्नी मीरा कलमाडी यांना पुण्यातून उमेदवारी देण्याचे आश्‍वासनही पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. काँग्रेस पक्षाची हायकमांड मीरा कलमाडी यांना तिकीट देण्यास उत्सुक आहेत, मात्र आदर्श घोटाळ्यानंतर सफाईचा झाडू हाती घेऊन महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी पाठविण्यात आलेले पृथ्वीराज चव्हाण हे भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन कलमाडीच काय मीरा कलमाडींना ही तिकीट देण्यास विरोध करीत असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा भ्रष्टाचार विरोध, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा, त्यांचा स्वच्छ उमेदवारांना तिकीट देण्याचा आग्रह आणि पुणे लोकसभा मतदार संघात कलमाडी यांच्या एकछत्री नेतृत्वामुळे असलेला पर्यायाचा अभाव अशा कोंडीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी सापडले आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे देखील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील मानले जातात. त्यामुळे त्यांचा शब्दही मोडणे पक्षश्रेष्ठींना जड जात आहे. 
पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत विश्‍वजीत कदम, उद्योग मंत्री नारायण राणे यांचे समर्थक आमदार विनायक निम्हण आणि विधानपरिषदेतील आमदार मोहन जोशी यांची नावे चर्चेत आहेत. शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक मानकर हे देखील उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. मानकर हे कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायची या तयारीत असून त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्याशी संधान बांधल्याचे वृत्त राजकीय वर्तुळात चर्चिले गेले. मात्र ठाकरे यांनी रविवारी मनसे वर्धापनदिनाचे औचित्य साधून आपल्या पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची यादी घोषित केली. त्यामध्ये दीपक पायगुडे यांच्या नावाचा समावेश आहे. दीपक पायगुडे आणि सुरेश कलमाडी यांच्यातील संबंध हे नेहमीच मधुर राहिले आहेत. त्यामुळे पायगुडे यांची मनसे उमेदवारी ही कलमाडी यांच्या मॅनेजमेंट प्रभावामुळेच झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पायगुडे हे मोठ्या प्रमाणात शिवसेनेची मते खाणार हे स्पष्ट असल्यामुळे काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास मीरा कलमाडी यांना पायगुडे यांचे निवडणूक लढविणे फायदेशीर ठरणार आहे. 
मुख्यमंत्री चव्हाण यांचा कलमाडी विरोध देखील आश्‍चर्यकारक ठरणार आहे. राहुल गांधी भ्रष्टाचाराच्या विरोधात दंड थोपटत असताना काँग्रेसला आदर्श प्रकरणामुळे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झालेले अशोक चव्हाण यांची उमेदवारी चालते, तर सध्या आरोप सिद्ध न होता ही तुरुंगवास भोगलेले खासदार सुरेश कलमाडी यांच्या पत्नीची उमेदवारी का खुपते; हा खरा प्रश्‍न आहे. स्वच्छतेचा झाडू घेऊन आलेल्या मुख्यमंत्र्यांना प्रसंगी अकार्यक्षमतेचा शिक्का मारुन घेऊनही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आल्याचे दिसून येत नाही. अन्यथा त्यांनी आदर्श घोटाळा प्रकरणातील समितीचा अहवाल बासनात बांधून ठेवला नसता. चव्हाण यांना काँग्रेस श्रेष्ठींच्या दबावाखाली ज्याप्रमाणे आदर्श अहवालाचे घोंगडे भिजत ठेवावे लागले, त्याचप्रमाणे कदाचित मीरा कलमाडी यांची उमेदवारी पत्करण्याची वेळ असल्याची चिह्ने आहेत. अर्थात निम्हण यांना उमेदवारी देण्याच्या आग्रहामागे मराठा लॉबीचे राजकारण असेल, तर हे चित्र बदलू शकते. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार विरोधी चेहरा उघडा पडणार असून ते देखील मराठा राजकारणाला खतपाणी घालीत असल्याचे उघड होणार आहे.

Leave a Comment