
शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी.पाटील यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर मोठे मार्मिक भाष्य केले आहे. आत्ताच्या राजकारणाला आणि निवडणुकांना कसलेचे तात्विक अधिष्ठान राहिलेले नाही. वैचारिक आधार तर नाहीच पण जनकल्याचा हेतूसुध्दा संपला आहे. निवडून येण्याची क्षमता आणि त्यासाठी निवडणुकीची यंत्रणा राबवण्याची क्षमता याच गोष्टीला महत्त्व आले आहे. ही क्षमता ज्याच्याकडे असेल त्याला वैचारिक बांधिलकी असो की नसो. तो निवडून येत आहे आणि सत्ता वापरून पैसा कमवून आपली ही क्षमता आणखीन वाढवत चालला आहे. आपल्या लोकशाहीचा हा प्रवास फार धोकादायक आहे. राजकारण हे तत्वाधिष्ठित असावे अशी चर्चा नेहमी केली जाते. पण भारतातले राजकारण वरचेवर तत्वांना सोडून चाललेले आहे. तत्वे गुंडाळून ठेवून व्यक्तीचा स्वार्थ आणि पक्षाचा स्वार्थ यांच्या आधारावर तत्वहीन तडजोडी करीत राजकारण पुढे वाटचाल करत आहे. ही आपल्या लोकशाहीची दयनीय बाजू आहे. कालच मध्य प्रदेशात एका सेवा निवृत्त सरकारी अधिकार्याने रात्रीतून पक्षांतर केले. त्याला कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती पण त्याला भाजपाच्या लोकांनी गाठले आणि तो रात्रीतून हिंदुत्ववादी झाला. त्याला भाजपाचे तिकिट मिळाले. तो आता भाजपाच्या तिकिटावर उभा आहे.
ज्या मतदारसंघात हा प्रकार घडत आहे तिथे गेल्या २५ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे काम करणारे हजारो कार्यकर्ते असतील. पण त्यांना बाजूस सारून रात्रीतून निष्ठा बदलणार्या या माणसाला भाजपाने तिकिट दिले. महाराष्ट्रात शिर्डी मतदार संघात हाच प्रकार घडला. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले वाकचौरे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये आले. शिवसेनेचा हिंदुत्वावाद सोडून कॉंग्रेसचा सेक्युलरवाद स्वीकारला आणि कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. अशा प्रकारच्या तडजोडी सगळ्याच मतदार संघात सुरू आहेत. शिवसेनेतून मनसेत येणार्या कार्यकर्त्यांना रात्रीतून पावन करून घेतले जाते आणि उमेदवारीसुध्दा दिली जाते. पक्ष बदलणे हा तर गुन्हा आहे. तो वैचारिक व्याभिचार आहे. पण त्याबद्दल या कार्यकर्त्यांना शिक्षा होण्याऐवजी उमेदवारी दिली जाते हे आपल्या राजकारणाचे चित्र मोठे भीषण आहे. राजकीय पक्ष उमेदवार आणि त्यांना निवडून देणारे लोक या सगळ्यांनीच नीती भ्रष्ट व्यवहार करण्याचे ठरवले आहे आणि सगळ्याचे पक्षाचे उच्च नेते या अधःपतनाला हातभार लावत आहेत.
१९६७ साली उत्तरेत कॉंग्रेसचा पराभव झाला तेव्हा निर्माण झालेल्या परिस्थितीन हे आयाराम गयाराम युग अवतरले आहे. उत्तर भारतातल्या ९ राज्यात कॉंग्रेसचा पराभव झाला होता पण कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यातून आघाड्या बिघाड्या, पाडापाडी आणि पक्षांतरे यांना गती आली. भारतातल्या राजकारणातली ती शोकांतिका होती आणि त्या काळात अशा पक्षांतराच्या माध्यमातून करोडो रुपयांची देवाणघेवाण होऊन राजकीय भ्रष्टाचाराला ऊत आला होता. ब्रिटनमध्ये या संबंधात काही कायदा नाही. १९८५ साली राहुल गांधी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी पक्षांतर बंदी कायदा केला. परंतु या कायद्यातल्या पळवाटा शोधून काढून पक्षांतरे जारी राहिली. भ्रष्टाचारही मागील पानांवरून पुढे सुरू राहिला. त्यावर वाजपेयी सरकारने हा कायदा अधिक कडक केला आणि पळवाटाही बुजवल्या. त्यामुळे निवडून आल्यानंतरच्या पक्षांतराला बराच पायबंद बसला. परंतु आयाराम गयाराम प्रवृत्ती काही पूर्णपणे संपली नाही. निवडून आल्यानंतरची सदनातली पक्षांतरे थांबली पण आता निवडून येण्याच्या आधीची पक्षांतरे जारी राहिली. आता निवडणुकीच्या तोंडावर तर पक्षांतराना आणि दल बदलूपणाला मोठीच गती आलेली दिसत आहे.
एखादा शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा चित्रपट निर्माता कसलेही सामाजिक काम न करता आणि साधी ग्रामपंचायतीची निवडणूकसुध्दा न लढवता सेवेतून निवृत्त होतो, एखाद्या पक्षात प्रवेश करतो आणि त्याला पक्षात प्रवेश करताच पक्ष प्रवेशाचे प्रमाणपत्र आणि एखाद्या लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अशा दोन्ही गोष्टी एका दमात दिल्या जातात. अनेक राजकीय कार्यकर्ते सतरंज्या उचलण्यापासून पक्षात कामे करत असतात. कधी कधी घरचे जेवण करून पक्षासाठी झटत असतात. पण त्यांना डावलून आणि निष्ठावंत तसेच विचारांशी बांधिलकी असणार्या कार्यकर्त्यांना उपेक्षित ठेवून या एक दिन के मेहमानला ताबडतोब लोकसभेवर पाठवण्याची तयारी होते. अशा शासकीय अधिकार्यांच्या विचाराचा कल त्या पक्षाकडे असतो म्हणून त्या पक्षात प्रवेश करतात असे मानले तरी काही राजकीय कार्यकर्ते सतत विविध पक्षात उड्या मारत असतात आणि एका पक्षातून दुसर्या पक्षात उडी मारल की त्यांची उमेदवारी खडी होते. किंबहुना ज्या पक्षात गेल्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळून विजयाची शक्यता आहे. त्या पक्षावर डोळा ठेवूनच हे नेते त्या पक्षात उडी मारत असतात. या पक्षांतरांना वैचारिक तारतम्यसुध्दा राहिलेले नाही. कोणीही कोणत्याही, क्षणी कोणत्याही पक्षात जातो. पैसा खर्च करण्याची तयारी दाखवतो. जातीय समीकरणे कशी आपल्या बाजूने आहेत हे पटवून देतो आणि त्या पक्षाच्या नेत्यांना तिकिट देण्याचे आश्वासन मागून मग त्या पक्षात प्रवेश करतो आणि आमदार बनतोसुध्दा. कारण त्याच्या वैचारिक निष्ठेपेक्षा निवडून येण्याच्या क्षमतेला महत्त्व आलेले आहे.