इस्लामाबाद – पाकिस्तानच्या राजधानीत स्थापित करण्यात आलेले श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग योग सेंटर या इमारतीला काही अज्ञात शस्त्रधारी लोकांनी पेटवून दिले. इस्लामाबादच्या बाणीगला भागात पीस स्ट्रीट या रस्त्यावरील हे सेंटर पेटवून देण्यात आले, तेव्हा तिथे दोन शस्त्रधारी आले आणि त्यांनी पैशाची मागणी करायला सुरुवात केली.
सुरक्षा रक्षकांनी पैशाविषयी काही माहिती नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या शस्त्रधारी अतिरेक्यांनी इमारतीला आग लावून दिली. या कामात त्यांना त्यांच्या अन्य सहा सहकार्यांनी मदत केली. त्यांनी इमारतीवर सर्वत्र पेट्रोल ओतले आणि त्यास आग लावून दिली. त्यात इमारतीच्या चार खोल्या जळून गेल्या.
या केंद्रातील अधिकारी मीना गबीना यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. हे आठ अतिरेकी एक शब्दही बोलत नव्हते आणि ते कारमधून आले होते. त्यांनी सुरक्षा रक्षकांना दोर्याने करकचून बांधले आणि नंतर आग लावली. शेजारपाजारचे लोक सारा प्रकार बघून पळत आले, तेव्हा हे अतिरेकी फरार झाले.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री रविशंकर यांनी २०१२ साली पाकिस्तानला भेट देऊन या केंद्राची स्थापना केली होती. याच वेळी त्यांनी पाकिस्तानमधल्या तालीबान अतिरेक्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. आर्ट ऑफ लिव्हिंगची १५२ देशात केंद्रे आहेत. पाकिस्तानात इस्लामाबाद, लाहोर आणि कराची या तीन शहरात केंद्रे कार्यरत आहेत.