युतीत महाभारत अटळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष शिवसेना आणि भाजपाची मते खातो म्हणून त्याला आपल्या महायुतीत घ्यावे आणि कॉंग्रेस विरोधी मतांची फूट टाळावी असा प्रयत्न नितीन गडकरी यांनी केला पण उद्धव ठाकरे यांच्या आडमुठेपणामुळे हा प्रयत्न फसला. त्यांना मुत्सद्दीपणा दाखवता आला नाही. मनसे युतीत येणे तर दूरच पण महायुतीत आहेत त्याच पक्षात दुफळी निर्माण होण्याची वेळ आली. शिवसेना नेत्यांनी राज ठाकरे यांना जवळ घेण्यापेक्षा युती तोडणे परवडेल अशी भूमिका घेतली. आपल्याला या पाच पांडवात जागा मिळत नाही असे दिसायला लागताच आता आता मनसेने आपले उमेदवार जाहीर केले असून स्वतंत्रपणाने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या उमेदवारांचा पहिला हप्ता जाहीर झाला आहे आणि दुसरा हप्ता लवकरच जाहीर होईल असे म्हटले आहे. आता भाजपा आणि शिवसेनेची काही मते मनसेला मिळून या युतीला धक्का बसणार आहे. तसा अनुभव २००९ साली आला होताच पण आता राज ठाकरे यांनी यातही एक वेगळा गेम केला आहे. आपण महायुतीत नसलो तरीही आणि आपले उमेदवार स्वतंत्रपणाने उभे करीत असलो तरी आपले उमेदवार निवडून आल्यानंतर पंतप्रधानपदासाठी नरेन्द्र मोदी यांच्याच मागे उभे राहतील असे त्यांनी जाहीर केले आहे.

राज ठाकरे यांचा हा पेच मोठा विचित्र आहे. त्यांनी या पेचातून उद्धव ठाकरे यांना एक निराळेच उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचा प्रयत्न नितीन गडकरी यांनी केला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांचा महायुतीतला प्रवेश आपल्या नकाराधिकाराचा वापर करून अडवला.
एवढेच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी राज ठाकरे यांना आत आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गडकरी यांना नको त्या शब्दात दोष दिला. उद्धव ठाकरे यांच्या हातात अधिकार आहे. ते राज ठाकरे यांचा महायुतीतला प्रवेश अडवू शकतात पण ते राज ठाकरे यांना मोदींना पाठींबा देण्यापासून काही रोखू शकत नाहीत. मोदींना पाठींबा हा काही उद्धव ठाकरे यांची मक्तेदारी नाही. युतीत यायचे नाही पण युतीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला पाठींबा मात्र द्यायचा असा हा आगळा वेगळा प्रकार आहे. अर्थात याचे अपूर्व प्रकाराचे श्रेय उद्धव ठाकरे यांनाच दिले पाहिजे. आता राज ठाकरे यांच्या उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ पहायला लागतो तेव्हा एक गोष्ट जाणवते की, आपले उमेदवार जाहीर करून राज यांनी शिवसेनेची कोंडी केली आहे. त्यांनी आता जाहीर केलेले उमेदवार भाजपापेक्षा शिवसेनेच्या उमेदवारांच्या पराभवाला कसे कारणीभूत ठरतील याचा बंदोबस्त केला आहे.

म्हणजे युतीत यायचे नाही, युतीतल्या एक पक्षाशी छुपी युती आणि दुसर्‍या पक्षाला मात्र थेट विरोध करायचा असे मनसेचे विचित्र धोरण आहे. मनसेच्या या धोरणामुळे भाजपा आणि शिवसेनेच्याही मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होणार आहे. भाजपा आणि शिवसेनेत संभ्रम निर्माण करणे हे आपले कर्तव्यच आहे अशी मनसेची भावना आणि त्यांनी आता आपल्या या डावाने हा संभ्रम अनेक आयामी केला आहे. गेल्या काही दिवसांत मनसेच्या हालचाली संभ्रमात सापडल्यागत झाल्या होत्या पण त्यांच्या गोंधळलेल्या मनस्थितीतही त्यांनी, म्हटले तर वेगळा पक्ष आणि म्हटले तर महायुतीतलाच सहावा घटक पक्ष असे आपले स्वरूप स्पष्ट केले आहे. महायुतीतले नेते आपल्या युतीला पाच पांडव म्हणत आहेत. हे पाच पांडव कोणते हे सर्वांना माहीत आहेच. भाजपा, शिवसेना, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभीमानी शेतकरी संघटना हे पाच पांडव आहेत. महाभारतात खरे पांडव पाच नव्हते. सहा होते. कर्ण हा सहावा पांडव होताच ना ? आता याही महायुतीतल्या पाच पांडवांना हा मनसे नावाचा सहावा भाऊ आहे पण तो त्यांच्यापासून वेगळा रहात आहे. राज ठाकरे हा कर्ण आहे. महाभारतात कर्णाला बरेच दिवस आपण पांडवाचा भाऊ आहोत हे माहीत नव्हते तेव्हा त्याने आपल्याच या पाच भावांच्या पत्नीच्या वस्त्रहरणाच्या वेळी दु:शासनाला प्रोत्साहन दिले होते.

आता राज ठाकरे युतीतल्या पाच पांडवाचा भाऊ असले तरी या युतीचे सत्ताग्रहण अशक्य करून टाकत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रात मात्र वेगळेच महाभारत घडणार आहे. राज ठाकरे यांनी जाहीर केलेले सात उमेदवार शिवसेनेचा काटा काढण्यास कारणीभूत ठरणार आहेत. हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास मनसेमुळे गेला असे म्हणण्याची वेळ शिवसेनेवर येणार आहे. ती आपत्ती शिवसेनेच्या राज द्वेषामुळे आलेली असेल. तिला तेच कारणीभूत ठरलेले दिसतील पण ते त्या स्थितीत मनसेपेक्षा भाजपाला जास्त दोष देणार आहेत. एकंदरीत या निवडणुकीत मनसेला चांगले यश मिळाले किंवा त्यांच्यामुळे शिवसेनेच्या काही जागा गेलेल्या दिसल्या तर शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख भाजपालाच दोष देणार आहेत. निवडणुकीनंतर युतीतली तणातणी वाढणार आहे. आता तरी उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी सुचलेली नाही निदान त्यानंतर होणार असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत तरी त्यांना चांगली बुद्धी व्हावी आणि कर्णाला पाच पांडवांच्या पक्षात घेण्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात यावे अशी अपेक्षा करू या.

Leave a Comment