भाजपाचे सोवळे फिटले

भारतीय जनता पार्टीचे नेते आपला पक्ष भ्रष्टाचाराच्या बाबतीत अगदी सोवळा असल्याचा आव आणत असतात. तत्त्वाचे राजकारण करत असल्याचा दावा करीत असतात. पण त्यांचे हे तत्त्वाचे राजकारण विरोधी बाकावर बसलेले असतानाच यथार्थ होते. त्यांनाही खुर्चीचा वास कळला. नरभक्षक वाघ पहिल्यांदा माणसाला खात नसतो पण त्याला मानवी रक्ताची चटक लागेपर्यंतच तो तसा असतो. एकदा चुकून जरी त्याला माणसाचे रक्त कसे असते हे कळले तर तो नंतर माणसाशिवाय कशालाही खात नाही. भाजपाचे नेते सत्तेवर नव्हते तेव्हा स्वच्छ होते पण सत्तेचा वाण त्यांना लागला आणि तेही भ्रष्टाचारी बनले. आता तोंडाने तत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या पण व्यवहार मात्र तडजोडीचा करायचा अशी कसरत करायला लागली की मात्र त्यांच्याही तोंडून दुहेरी भाषा यायला लागते. या बोटावरची थुंकी करण्याची वेळ त्यांच्यावर येते आणि मग आज त्यांच्या ज्या शाब्दिक कसरती चालू आहेत त्या तशा अव्याहतपणे सरू राहतात. आताच्या निवडणुकीत भजपा नेते कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारावर घणाघात घालत आहेत पण स्वत: मात्र मागच्या दाराने हळूच आपल्या पक्षातल्या भ्रष्ट नेत्यांना आत प्रवेश देत आहेत.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेऊन आणि त्यांना निवडणुकीला उभे करून भाजपाने आपलेही वर्तन कॉंग्रेस पेक्षा वेगळे नाही हे दाखवून दिले आहे. भाजपाने त्यापूर्वी येडीयुरप्पा यांनी स्थापन केलेला कर्नाटक जनता पार्टी हा पक्ष त्यांच्या भ्रष्ट प्रतिमेसह स्वीकारला आहे. मुळात येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आदेश देतानाच भाजपा नेत्यांची घाबरगुंडी उडाली होती. त्यांनी आधी त्यांना काढले पण त्यांना भ्रष्ट येडीयुरप्पांना काढणे आपल्याला फारसे परवडणारे नाही याची त्यांना विधानसभा निवडणुकीत जाणीव झाली. सत्ता महत्त्वाची की प्रतिमा महत्त्वाची या द्वंद्वात आता पक्षाने पक्षाच्या प्रतिमेपेक्षा सत्ता मिळण्याला प्राधान्य दिले आणि येडीयुरप्पांना पावन करून घेतले. भाजपाच्या नेत्यांना या पलटीचे समर्थन करायला एक मुद्दा तरी आहे. येडीयुरप्पा हे आरोपी आहेत गुन्हेगार नाहीत. गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना पक्षातून काढण्याचे काही कारण नाही. त्यांचा हाच मुद्दा पकडून सुरेश कलमाडी आणि अशोकराव चव्हाण यांना कॉंग्रेसकडून बोहल्यावर चढवले जात आहे. त्यांच्या विरोधातला गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही असा त्यांचाही युक्तिवाद आहे. लालू प्रसाद यांना कॉंग्रेसने जवळ केले आहे. त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे त्या लालूंना तर न्यायालयाने अपराधी ठरवून शिक्षा केलेली आहे पण कॉंग्रेसचे नेते लालूर्ंच्ंया भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाहीत. उलट त्यांच्याशी युती करण्याची धडपड करीत आहेत.

अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी यांनाही ते पावन करून घेणार आहेत. अशोक चव्हाण, कलमाडी आणि येडीयुरप्पा यांचे अपराध सिद्ध होऊन ते न्यायालयात अपराधी ठरलेले नाहीत आणि त्या अर्थाने ते आता ते निर्दोष असतील तर कॉंग्रेसने कलमाडी यांना पक्षातून निलंबित का केले आणि अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून का काढले ? असाच प्रश्‍न भाजपालाही येडीयुरप्पा यांच्या बाबतीत विचारायला हवा. हे प्रश्‍न बिनतोड आहेत पण त्यांची उत्तरे देणे सयुक्तिक नाही कारण त्यांच्या बाबतीत या पक्षांचे धोरण सोयीनुसार बदलत आले आहे. त्यांना या तिघांना दोषी ठरवणे सोयीचे होते तेव्हा तसे ठरवून बाहेर काढले आणि आता त्यांची गरज पडताच त्यांच्यावर युक्तिवादाचे गंगाजल शिंपडून त्यांना पावन करून घेतले आहे. कर्नाटकात भाजपाला विधानसभा निवडणुकीत धक्का बसून हातची सत्ता गमवावी लागली नसती तर त्यांना भ्रष्ट येडीयुरप्पांचे राजकीय महत्त्व कळले नसते आणि ते अपराधी आहेत की केवळ आरोपी आहेत अशी चर्चाही करीत बसले नसते. त्यांना पक्षातून काढून आपणच भ्रष्टाचाराशी कसे लढत आहोत अशा बढाया मारत बसले असते.

दोन्ही पक्षांचे हे वर्तन दुतोंडीपणाचे आहे. बिहारात कॉंग्रेसने अशीच पलटी मारली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री चारा फेम लालू प्रसाद यादव यांनी तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जेलची हवा खावी लागली असली तरीही त्यांच्याशी युती केली आहे. या मुद्यावरून भारतीय जनता पार्टीतील अंतर्गत मतभेदही असे उफाळून आले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी आणि सुषमा स्वराज यांनी पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांची भेट घेऊन येडीयुरप्पा यांना पक्षात घेतल्याबद्दल त्यांच्याशी वाद घातला. कलंकित मुख्यमंत्री म्हणून ज्याला आपण पक्षातून काढून टाकले त्याच नेत्याला पुन्हा पक्षात का घेतले, अशाने पक्षाची प्रतिमा मलीन होणार नाही का, असा सवाल पक्षाध्यक्षांना केला. या प्रश्‍नामागे मोठा इतिहास आहे. दोन वर्षांपूर्वी कर्नाटक भाजपाची भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून खूप बदनामी झाली. कर्नाटकातील रेड्डी बंधू यांनी लोह खाणींमध्ये खूप भ्रष्टाचार केला आहे. या रेड्डी बंधूंना सुषमा स्वराज यांचाच आशीर्वाद असल्याची चर्चा होती आणि तिला अरुण जेटली यांची फूस होती. त्यामुळे रेड्डी बंधूंवरून आणि कर्नाटकातल्या भ्रष्टाचारावरून सुषमा स्वराज विरुद्ध उत्तर प्रदेशाची लॉबी सक्रिय झाली होती. आता सुषमा स्वराज यांनी परतफेड केली आहे.

Leave a Comment