हेमंत गोडसेंना उमेदवारी देत राज यांची कोंडी

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा नाशिकमध्ये डौलाने फडकावण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित करून राज ठाकरे यांची नाकेबंदी करण्याची पहिली खेळी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेला नेहमीच खिंडीत पकडण्यात माहिर असलेले राज ठाकरे शिवसेनेला कसे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज यांनी महायुतीत सामील व्हावे किंवा नाशिक, पुणे व मुंबईतील एखादी अशा मोजक्याच जागा लढवाव्यात, अशी विनंती नितीन गडकरी यांनी राजभेटीच्या दरम्यान केल्याची चर्चा होती. कारण नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला; तर मुंबई-पुण्यात चांगली ताकद असल्याचे मानण्यात येते. परंतु, शिवसेनेच्या विरोधामुळे राज ठाकरे यांना महायुतीमध्ये सामील करून घेण्याचे भाजपचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे याच आठवड्यात मनसे लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले.

येत्या रविवारी मनसेच्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात राज किती व कोणत्या जागा जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीत मनसेने ११ जागा लढवत १४ लाख मते घेतली होती. यात नाशिकमधून हेमंत गोडसे अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले होते. गोडसे नाशिकमधील मनसेचे महत्त्वाचे मोहरे मानले जात असतानाच पक्षाच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचे मानण्यात येत होते. आता लोकसभा निवडणुकीत गोडसे यांनाच शिवसेनेने मैदानात उतरविण्याने राज यांची नाकेबंदी झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकसाठी राज कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने १४ उमेदवार घोषित केले असतानाच आज नाशिकमधून हेमंत गोडसे व उस्मानाबादमधून रवी गायकवाड यांची नावे जाहीर केली आहेत. गेल्या निवडणुकीत रवी गायकवाड यांचादेखील अगदी कमी मतांनी पराभव झाला होता.

Leave a Comment