शेलार-तावडे पुन्हा ‘राज’ दरबारी

मुंबई – राज-गडकरी भेटीवर शिवसेनेने टोकाची आगपाखड करुनही भाजपचे मनसे प्रेम अजिबात कमी झालेले नाही. भाजप नेते आशिष शेलार आणि विनोद तावडे यांची कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर बैठक सुरु आहे. आगामी विधान परिषद निवडणूकीसंदर्भात ही बैठक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

गुरुवारीच जनसूराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे आणि शेकापचे जयंत पाटील यांनी कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये महाराष्ट्राला नव्या आघाडीचा पर्याय देण्यावर चर्चा झाली. या भेटीनंतर आज लगेचच भाजप नेते कृष्णकुंजवर पोहोचल्याने वेगवेगळया राजकीय तर्क-विर्तकांना जोर आला आहे. राज यांचे तिस-या आघाडीपासून मन वळवण्यासाठीही भेट असू शकते किंवा शिवसेनेला त्यांच्या इशा-याची जागा दाखवून देणे हा सुध्दा या भेटीमागे उद्देश असू शकतो.

गेल्या आठवडयात नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. या भेटीवरुन शिवसेना नेतृत्व कमालीचे अस्वस्थ झाले होते. शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून गडकरींची व्यापारी अशी संभावना केली होती. शिवसेना नेतृत्वाची नाराजी दूर करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना थेट मध्यरात्री मातोश्रीवर जावे लागले होते. एवढ सगळ होऊनही भाजप नेते पुन्हा राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने नेमक भाजपच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न निर्माण होतो.

Leave a Comment