पात्रता परीक्षेत ९४ टक्के शिक्षक नापास

मुंबई- राज्यातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा वाढवण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) ९४ टक्क्यांहून अधिक शिक्षक नापास झाले आहेत. टीईटीच्या पहिल्याच निकालात मोठ्या प्रमाणावर शिक्षक नापास झाल्याने राज्यातील त्यांच्या गुणवत्तेचेच वाभाडे निघाले आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने १५ डिसेंबर रोजी घेतलेल्या टीईटीची परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पहिली ते पाचवीसाठीच्या शिक्षकांचा एकूण निकाल केवळ ४.४३ टक्के तर सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या परीक्षेचा एकूण निकाल ५.९५ टक्के लागला आहे. राज्यात टीईटीच्या पहिली परीक्षेला राज्यातून ६ लाख २१ हजार ११५ शिक्षक उमेदवार बसले होते.

या परीक्षेत राहिलेल्या काही त्रुटींची परीक्षा परिषदेने नंतर दुरूस्ती करून घेतली. या परीक्षेत अनेक प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेर विचारण्यात आल्याने याविरोधात काही शिक्षक संघटना आणि विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेतला होता. तर काही शिक्षक आमदारांनी ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही शिक्षण विभागाने योग्य नियोजन करून ही परीक्षा सुरळीत पाडली.