हसणारा, वाचणारा ,गाणारा रोबो

यांत्रिक कामे करणारे रोबो आता सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत. जगातील सर्वाधिक आधुनिक रोबोही आता प्रत्यक्षात आला असून हा रोबो केवळ चालणारा रोबो नाही तर तो बोलेल, गाणी म्हणेल, पुस्तके वर्तमानपत्रे वाचेल इतकेच नव्हे तर हवामानाचा अंदाज देईल, इंटरनेट शॉपिंग करेल आणि माणसाच्या भावनाही समजून घेईल. विस्मरणाची व्याधी असलेल्या लहान मुलाना आणि वृद्धांसाठी तर तो जिवलग साथीच बनून राहणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी विदयार्थी आणि ऑस्ट्रेलियातील ला त्रोब विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले राजीव खोसला यांनी हा रोबो बनविला आहे. चार्लस किवा चार्ली या नावाचा हा रोबो जगातील सर्वात आधुनिक रोबो आहे. चार्ली आणि त्याचे सहकारी मेटिल्डा, जेफ, ल्यूसी, सोफी यांच्या अनेक चाचण्या घेतल्या गेल्या असून त्या सर्व यशस्वी झाल्या आहेत.

खोसला सांगतात २० सेंमीचा हा रोबो सेरेब्रल पाल्सी, डिमेश्निया, ऑटिझमची शिकार झालेल्या लहान मुलांसाठी फारच उपयुक्त आहेच पण विस्मरणाची शिकार झालेल्या घरातील वृद्धांसाठीही तो चांगलाच उपयुक्त ठरेल. आदेश देणे, स्पर्शातून समजून घेणे, चेहर्‍यावरचे भाव ओळखणे अशा अनेक खुबी या रोबोत आहेत. विस्मरणाची शिकार झालेली मुले हात धुवायचे विसरतात, हा रोबो त्यांना ती आठवण करून देईल, त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवील.

हे रोबो बहुभाषी आहेत आणि ज्याच्यासाठी त्यांचा वापर करायचा आहे, त्या व्यक्तीची भाषा, जीवनशैली लक्षात घेऊन ते तयार करता येतात. हे रोबो सबंधित व्यक्ती कशी आहे याचा विचार करून त्यानुसार सेवा देऊ शकतात व यामुळे ते उत्तम साथीदार, गाईड बनू शकतात असेही खोसला यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment