विरोधी पक्षनेतेपद व आमदारकी धोक्यात आल्यानेच तावडेंची शिवसेनेवर आगपाखड?

मुंबई- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद व आमदारकी धोक्यात आल्याने विनोद तावडे यांनी शिवसेनेवर आगपाखड केल्याचे दिसून येत आहे. विधान परिषदेसाठी उमेदवार देताना शिवसेनेने समन्वय साधायला हवा होता, सेनेने दोन उमेदवार उभे करून घोडे बाजाराला प्रोत्साहन दिले आहे, अशी टीका विनोद तावडे यांनी काल सायंकाळी सेनेवर केली होती. मनसेकडे असलेली ११-१२ मते भाजपला मिळावीत यासाठी आशिष शेलार यांच्यासह तावडे यांनी कृष्णकूंजवर जाऊन राज यांची भेट घेतली होती. मात्र मनसेने मागील वेळी आशिष शेलार यांना निवडून आणण्यासाठी मदत केली होती. आता तुम्हीच आम्हाला यावेळी मदत करून पैरा फेडावा, असे तावडे-शेलार जोडीला राज यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपली आमदारकीसह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद गमविण्याची पाळी तावडेंवर येण्याची शक्यता आहे.

तावडे यांनी मागील आठवड्यात तौ-यात आपण विधानसभा लढविणार असल्याचे म्हटले होते. मात्र आठवड्याभरातच पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी त्यांनी धडपड सुरु केली आहे. मात्र यात त्यांना यश मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजपकडे विधानसभेत ४७ आमदार आहेत. एक उमेदवार निवडून येण्यास २९ मतांची गरज आहे. अशा स्थितीत ज्येष्ठ नेते पांडूरंग फुंडकर यांचा मार्ग सुकर झाल्यानंतर तावडेंसाठी भाजपकडे १८ मते शिल्लक राहतात. अशा स्थितीत मनसेची ११ मते तावडेंच्या पारड्यात आली तर तावडे निवडून येऊ शकतात अन्यथा नाही अशी स्थिती आहे.

Leave a Comment