मुंबई – कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा पेच कायम राहिल्याने अखेर दोन लोकसभा मतदारसंघांची अदलाबदल करण्याचे सूचित केले जात आहे. मराठवाड्यातील हिंगोली कॉंग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादी’ने दाखविली असून, त्या बदल्यात जालना मतदारसंघाची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. रायगड मतदारसंघात कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने येथे राष्ट्रवादी’ने दावा केला आहे. मात्र त्या बदल्यात राष्ट्रवादी’च्या मावळ मतदारसंघावर कॉंग्रेसने दावा केला आहे. या मतदारसंघांची अदलाबदल शक्य असल्याचे राष्ट्रवादी’च्या सूत्रांनी सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी’ने अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्याची तयारी केली होती. मात्र पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांच्या प्रलंबित विषयावर सरकारने निर्णय घेतला नसल्याने ते नाराज असल्याचे समजते.
त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी’ला नाराजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने येथे रायगड जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांना उमेदवारी देण्याची कॉंग्रेसने तयारी केल्याचे सांगितले जाते. रामशेठ ठाकूर हे सक्षम उमेदवार असल्याने विजयाची खात्री असल्याचा दावा करण्यात येत आहे. रायगडमधून राष्ट्रवादी’चे विद्यमान मंत्री सुनील तटकरे हे सक्षम उमेदवार असल्याचे सांगितले जाते. जालना या मतदारसंघातून उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादी’कडून सूचित केले जात आहे, तर हातकणंगले मतदारसंघात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनाच अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली जाईल, असे राष्ट्रवादी’च्या सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी’ने या वेळी किमान १५ मतदारसंघांत विजय मिळवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी पक्षाने सहा महिन्यांपूर्वीच केली होती. मात्र आतापर्यंत जाहीर झालेल्या १९ मतदारसंघांपैकी केवळ दोन जागांवरच राष्ट्रवादी’ने विद्यमान मंत्र्यांना संधी दिली आहे. यामध्ये नाशिकमधून छगन भुजबळ, तर बीडमधून राज्यमंत्री सुरेश धस यांचा समावेश आहे. कॉंग्रेससोबत या दोन जागांची अदलाबदल झाल्यास, तीन नवे मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी शक्यता राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.