सिझेरियनचे गंभीर वाढते प्रमाण

प्रसूतीसाठी नैसर्गिक मार्ग अवलंबिण्या ऐवजी सिझेरियन सेक्शन किंवा ऑपरेशन यांचा अवलंब करण्याचे प्रमाण देशात वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार लोक चिंता व्यक्त करत आहेत. प्रसूतीमध्ये काही अडचण असेल किंवा बाळाची स्थिती योग्य नसेल अशा परिस्थितीमध्ये अपरिहार्यता म्हणून असे ऑपरेशन करण्यास काही हरकत नाही. देशामध्ये अशा शस्त्रक्रियांचे प्रमाण ९ टक्के एवढे आहे. परंतु वैद्यकीय संस्थांनी केलेल्या पाहणीमध्ये सरकारी रुग्णालयांपेक्षा खाजगी रुग्णालयात सिझेरियन सेक्शनची शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण अतीच झाले आहे. सरकारी रुग्णालयातील सिझेरियनच्या प्रमाणापेक्षा खाजगी रुग्णालयातील प्रमाण काही ठिकाणी चौपट तर काही ठिकाणी दसपट झालेले आहे. म्हणजे खाजगी रुग्णालयात आवश्यकता नसताना अनेक महिलांवर ही शस्त्रक्रिया केली जात आहे. भारताची जनगणना करणार्‍या कार्यालयाने सिझेरियनच्या प्रमाणाचीही गणना केली आहे आणि केवळ या एका गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी देशाच्या नऊ राज्यातील २८४ जिल्ह्यातील एक कोटी ८० लाख लोकांकडून आवश्यक त्या माहितीचे ङ्गॉर्म भरून घेतलेले आहे. एवढा व्यापक सर्व्हे केल्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रियेच्या बाबतीत खरी आणि व्यापक आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

या पाहणीसाठी आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओरिसा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या नऊ राज्यांची निवड करण्यात आली होती. आसाममध्ये सरकारी रुग्णालयात दहा टक्के महिलांवर शस्त्रक्रिया करावी लागते. परंतु याच राज्यातल्या खाजगी रुग्णालयात मात्र ४१ टक्के महिलांची प्रसूती सिझेरियनने होते. ओडिशा हे एक असेच सिझेरियनचा अतिरेक झालेले राज्य आहे. या राज्याच्या खाजगी रुग्णालया मध्ये ४० टक्के बाळंतपणे शस्त्रक्रियेद्वारा होतात. परंतु याच राज्याच्या सरकारी रुग्णालयात मात्र केवळ ७ टक्के महिलांची प्रसूती शस्त्रक्रियेने करावी लागते. उत्तराखंडमध्ये शासकीय रुग्णालयातील सिझेरियनचे प्रमाण केवळ १० टक्के आहे आणि हेच खाजगी रुग्णालयातील प्रमाण ३० टक्के आहे. पाहणी करण्यासाठी निवडलेल्या अन्य कोणत्याही राज्यामध्ये सरकारी रुग्णालयातील सिझेरियनचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा अधिक नाही. बिहारमध्ये तर ते ३ टक्के आणि मध्य प्रदेशात केवळ ४ टक्के आहे. परंतु या सर्व राज्यांमध्ये सिझेरियनचे खाजगी रुग्णालयातले प्रमाण किमान २० टक्के आणि कमाल ३४ टक्के आहे. खाजगी रुग्णालयामध्ये सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण एवढे मोठे असण्यामागे पैशाची लालूच हे एक कारण आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कारण अशी शस्त्रक्रिया केल्यास किमान २५ हजार रुपये ङ्गी आकारली जाते. त्यामुळे प्रसूतीमध्ये थोडी जरी गुंतागुंत दिसली तरी डॉक्टर सिझेरियन सेक्शनचा सल्ला देतात आणि प्रसूत होणार्‍या महिला सुद्धा प्रसूती वेदना टळत असतील तर बरेच होईल असा विचार करून शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार होतात. त्यांच्या कुटुंबातले लोक सुद्धा बाळाच्या किंवा आईच्या जीवाला धोका नको म्हणून शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारतात. या संबंधात जागतिक आरोग्य संघटनेने काही पाहणी केलेली आहे आणि या संघटनेच्या म्हणण्यानुसार १० ते १५ टक्के महिलांनाच अशा शस्त्रक्रियांची गरज असते. अशा शस्त्रक्रियांचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांच्या पुढे वाढत असेल तर त्या मागच्या कारणांचा शोध घेतला गेला पाहिजे, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे मात्र यापेक्षा वेगळे आहे. जागतिक आरोग्य संघटना १० ते १५ टक्के महिलांच्या बाबतीत सिझेरियनला मान्यता देते आणि हे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत असल्यास ती स्थिती सामान्य मानली जावी, असे संघटनेचे मत आहे.

भारतामध्ये हे प्रमाण ९ टक्केच आहे. तेव्हा भारतात या संबंधात काही तरी चुकीचे घडत आहे, असे म्हणण्यास जागा नाही असे खाजगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. खाजगी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया जास्त होतात आणि ते प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने निर्देशित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. परंतु यामागचे कारणही समजून घेतले पाहिजे. ज्या महिलांच्या बाळंतपणात काही गुंतागुंत असते त्या महिला सरकारी रुग्णालयात जातच नाहीत. कारण सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रियांची सोय नसते आणि तिथले डॉक्टर ङ्गार आस्थेने उपचारही करत नाहीत. त्यामुळे ज्यांना शस्त्रक्रियांची गरज असते अशा महिला खाजगी रुग्णालयात जास्त प्रमाणात येतात. त्यामुळे खाजगी रुग्णालयात येणार्‍या महिलांमध्ये सिझेरियन सेक्शनच्या केसेस तुलनेने जास्त आढळतात. डॉक्टर मंडळी पैशाच्या आशेने सिझेरियन करतात हा आरोप सरसहा सर्वांवर लावता येणार नाही. खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही दवाखान्यांची सरासरी काढली तर सिझेरियनचे प्रमाण ९ टक्के एवढे म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेल्या पेक्षा कमीच आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment