इस्लामाबाद- देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात असलेले पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा खटला चालविणार्या वकीलांना शिरच्छेद करण्याची धमकी तेहरीक ए तालिबान या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेने दिली असल्याचे समजते. यामुळे या वकीलांनी हा दावा अन्यत्र हलवावा असा अर्ज न्यायालयाला दिला आहे. न्यायालयाने मात्र हा अर्ज फेटाळून लावला आहे.
या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार मुशर्रफ याच्यातर्फे अहमद रजा कसूरी, अन्वर मसूर आणि शरीफुद्दीन पीरजादा हे वकील मुशर्रफ यांची बाजू मांडत आहेत. मात्र या तिघांनाही तालिबान्यांनी शिर धडावेगळे केले जाईल अशी धमकी दिली असल्याच पत्र वकीलांनी न्यायालयाला सादर केले आहे. इस्लामाबादेतील न्यायालयात नुकत्याच करण्यात आलेल्या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाल्याने हा दावा अन्यत्र चालविला जावा अशीही वकीलांची मागणी आहे.
न्यायाधीश फैसल अरब यांनी मात्र अशी धमकी आली म्हणून दावा अन्यत्र नेता येणार नाही असे स्पष्ट करतानाच न्यायालयाला जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे आणि जिवाला धोका म्हणून न्यायालय आपले कर्तव्य सोडू शकत नाही असे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने पोलिस महासंचालक आणि पोलिस अधिकार्यांबरोबर चर्चा केली असून न्यायालयाची जागा सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले असल्याचेही स्पष्ट केले आहे. मुशर्रफ यांच्याविरोधातील दाव्याची सुनावणी ११ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली आहे आणि या दिवशी हजर राहण्याचे आदेश मुशर्रफ यांना दिले गेले आहेत असेही समजते.