भारताचा अफगाणिस्तानवर आठ गडी राखून विजय

मिरपूर- माजी विजेत्या भारताने आशिया चषकाचा शेवट गोड केला. साखळीतील शेवटच्या लढतीत बुधवारी त्यांनी अफगाणिस्तानला आठ विकेट आणि १७.४ षटके राखून हरवले. स्पर्धेत प्रथमच भारताला बोनस गुणाने विजय मिळवता आला.

वास्तविक पाहता उत्तरार्धातच गोलंदाजांनी भारताचा विजय नक्की केला होता. त्यानंतर शिखर धवनने नवा सहकारी अजिंक्य रहाणेसह १२१ धावांची सलामी दिल्याने अफगाणिस्तानचे १६० धावांचे आव्हान भारताने ३२.२ षटकांत दोन विकेटच्या बदल्यात पार केले. सलामीचा नवा प्रयोग यशस्वी ठरला. दिली. रहाणेने स्पर्धेतील दुसरे आणि एकूण पाचवे अर्धशतक झळकावताना ६६ चेंडूंत ५ चौकारांसह ५६ धावा केल्या. धवनचेही स्पर्धेतील हे दुसरेच अर्धशतक आहे. त्याने ६० धावा करण्यासाठी ७८ चेंडू घेतले. त्यात चार चौकार आणि एका षटकाराच समावेश आहे.

शतकी सलामी फुटली तेव्हा भारताला विजयासाठी आणखी ३७ धावांची आवश्यकता होती. रोहित शर्मा (नाबाद १८) आणि दिनेश कार्तिकने (नाबाद २१) तितक्या धावा करताना संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारताने पुन्हा एकदा प्रतिस्पध्र्याना फलंदाजीला आमंत्रित केले. अष्टपैलू रवींद्र जडेजा (४ विकेट) आणि ऑफस्पिनर आर. अश्विनच्या (३ विकेट) अचूक मा-यासमोर बांगलादेशचा डाव ४५.२ षटकांत १५९ धावांत संपला. जडेजा आणि मध्यमगती मोहम्मद शामीची (२ विकेट) सुरेख साथ लाभली.

अफगाणिस्तानच्या केवळ तीन फलंदाजांनी दोन आकडी धावा करता आल्या. त्यात सर्वाधिक योगदान आठव्या क्रमांकावरील समिउल्लाह शेनवरीचे (५०) राहिले. त्याने या स्पर्धेतील दुसरे आणि एकूण पाचवे अर्धशतक ठोकताना ६ चौकार आणि एक षटकार लगावला. नूर अली झरडनने (३१) चांगली सुरुवात करताना नवरोझ मंगलसह ३० धावांची सलामी दिली तरी सहाव्या षटकात शामीने भारताला ‘ब्रेक थ्रु’ मिळवून दिला.

११व्या षटकांत त्यांचे अर्धशतक फलकावर लागले तरी डावखुरा जडेजाच्या प्रभावी गोलंदाजीसमोर आघाडी फळी कोसळल्याने ५ बाद ६४ धावा अशी अफगाणिस्तानची अवस्था झाली. मधल्या फळीत मोहम्मद शहझादने (२२) थोडा प्रतिकार केला तरी एका क्षणी ७ बाद ९५ अशी स्थिती होती. मात्र आठव्या क्रमांकावरील शेनवरीने उपयुक्त अर्धशतक झळकावताना संघाला दीडशेची मजल गाठून दिली. शामी वगळता भारताच्या सर्वच गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. भुवनेश्वर कुमारसह अमित मिश्रा, रवींद्र जडेजा आणि अश्विनने षटकामागे जास्तीत जास्त तीन धावा मोजल्या.

Leave a Comment