अल्पआहारी दीर्घजीवी

आपले आरोग्य कसे सांभाळता येईल, हा प्रश्‍न प्रत्येकालाच भेडसावत असतो आणि ते सांभाळता यावे यासाठी प्रत्येक जण अनेक पथ्ये पाळण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोक व्यायाम करतात, काही ङ्गिरायला जातात तर काही लोक व्यायामशाळेत जाऊन तिथली निरनिराळी साधने वापरून आरोग्य रक्षणाचा प्रयत्न करतात. मात्र काही लोक कसलाही व्यायाम न करता टुणटुणीत राहतात. ते जास्त जगतात सुद्धा आणि व्यायाम करणारे मात्र व्यायाम करून सुद्धा आजारी पडतात. मग दीर्घ आयुष्य आणि निरामय जीवन यासाठी नेमके काय आवश्यक आहे, असा प्रश्‍न नेहमीच तज्ज्ञांना पडलेला असतो.

बीबीसी लंडन या वाहिनीच्या सायन्स शो या कार्यक्रमात डॉ. मायकेल मोस्ले यांनी या संबंधात एक चांगला विचार मांडलेला आहे. आपल्या आयुष्याची लांबी आणि आरोग्य विषयक दर्जा व्यायामापेक्षा सुद्धा आपण काय, कधी आणि किती खातो यावर जास्त अवलंबून आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आपले शरीर किती ऊर्जा वापरते याला आपल्या आयुष्यामध्ये सर्वाधिक महत्व आहे आणि या ऊर्जेची साठवण आणि विनियोग या दोन गोष्टींचा बारकाईने विचार केला तर व्यायाम न करता सुद्धा आपल्या दीर्घ आणि निरामय आयुष्य लाभू शकते.

आपल्या शरीराची ऊर्जेची गरज अन्नातून पूर्ण होत असते. आपण भरपूर कष्ट केले की, आपल्या शरीरातील ऊर्जा खर्च होते. तिची भरपाई करण्यासाठी आहार घ्यावा लागतो. तो अधिक उष्मांकाचा असावा लागतो. तेव्हा आपण अधिक कष्ट करतो, अधिक थकतो, अधिक ऊर्जा खर्च करतो आणि अधिक आहार घेतो. तेव्हा उष्मांकाच्या रुपाने आपल्या शरीरामध्ये भरपूर अन्न येते आणि ते पचवून ऊर्जा तयार करण्याच्या प्रक्रियेत शरीरामध्ये काही नवे बायप्रॉडक्ट तयार होतात जे माणसाच्या शरीराला वृद्ध करत असतात. ही प्रोसेस टाळून आपण कमी कष्ट, भरपूर विश्रांती आणि कमी उष्मांकाचे थोडे अन्न असा क्रम ठेवला तर आपल्या शरीरामध्ये अन्न कमी घेतले जाते आणि अन्नाचे रुपांतर ऊर्जेत करण्याची प्रक्रियाही कमी चालते. त्यामुळे वृद्धत्व निर्माण करणार्‍या घटकांची निर्मितीही कमी होते. परिणामी वृद्धत्व लवकर येत नाही.

याच युक्तीवादातून असेही म्हणता येते की, कमी खाण्यापेक्षा सुद्धा अधूनमधून उपवास करण्याने ही प्रक्रिया कमी होते. म्हणजे उपवास केला की, पोटात अन्न घालण्याचा प्रश्‍न येत नाही, उष्मांक कमी मिळतात, पचण्याची प्रक्रिया घडत नाही आणि वृद्धत्व लांबणीवर पडते. महात्मा गांधी यांनी या गोष्टीचा अवलंब भरपूर केलेला होता. ते हलकीङ्गुलकी कामे करीत सतत कार्यरत रहात, आहार कमी घेत आणि अधूनमधून उपवास करीत. म्हणून त्यांनी सांगून ठेवले होते की, ‘अल्पाहारी हा दीर्घजीवी असतो.’

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही