खेळाडुना जाणवतोय मानसिक थकवा – रायडू

मिरपूर- गेल्या काही दिवसांपासून सततच्या क्रिकेटमुळे टीम इंडिया कंटाळली आहे. दररोज बॅग उचलायची अन् विमानात बसायचे, एका ठिकाणचा दौरा आटोपला की दुस-या दौ-यासाठी सज्ज असा दिनक्रम झाला आहे. सततच्या दौ-यामुळेच भारतीय संघातील काही जणांना मानसिक थकवा जाणवू लागल्याची माहिती सध्याच्या टीम इंडियातील मधल्या फळीचा फलंदाज अम्बटी रायुडू याने दिली.

याविषयी बोलताना अम्बसटी रायडू म्हणाला, ‘टीम इंडिया सातत्याने दौरे करतो आहे. आधी दक्षिण आफ्रिका दौरा व नंतर न्यूझीलंड दौरा असा व्यस्त कार्यक्रम टीम इंडियाला करावा लागला. तिथून परतल्यावर अवघ्या दोन दिवसांत आम्ही आशिया कपसाठी सज्ज झालो. आरामाची, विश्रांतीची संधीच मिळाली नाही’,

रायडूचा आशिया कपसाठी टीम इंडियात समावेश झाला असला तरी संघातील इतर आघाडीचे खेळाडू मात्र दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड दौरा करून आले आहेत. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधूनच बहुदा रायुडूला ही मा‌हिती कळली असावी. मात्र खेळाडूंची समस्या थेट मीडियासमोर मांडल्याने बहुदा रायुडूला तंबी मिळण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.
आशिया कप स्पर्धेतही भारतीय संघ अपयशाचा कित्ता गिरवतो आहे, पण रायुडूच्या मते मात्र संघ खूपच मेहनत घेतो आहे. ‘इतर कुठल्याही संघाच्या तुलनेत आम्ही नक्कीच खूप मेहनत घेत आहोत. त्यातच टीम इंडियातील खेळाडू सातत्याने खेळत आहेत. आम्ही पाच दिवसांमध्ये तीन सामने खेळलो आहोत. आणि तसेही लागोपाठच्या सामन्यांनंतर आम्हीच काय पण कोणताही संघ सराव करत नाही.

Leave a Comment