सत्यमेव जयते भाग दोन यशस्वी ठरेल?

भारतीय दूरदर्शनवरील ऑफ्रा विनफ्रे शो अशी प्रसिद्धी मिळविलेल्या आमीर खानच्या सत्यमेव जयतेच्या दुसर्‍या भागाची सुरवात नुकतीच झाली असून पहिल्या भागाप्रमाणेच या भागाबद्दलच्या उलटसुलट प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. गतवेळच्या भागांप्रमाणेच ही मालिका यशस्वी होणार का याविषयी उत्सुकता आहेच पण यात मांडल्या जाणार्‍या महत्त्वपूर्ण मुद्द्यांमुळे पुन्हा एकदा वादाला निमंत्रण मिळणार आहे हेही खरे आहे.

आमीरखानची ही मालिका पहिल्या भागात तुफान यशस्वी ठरली होती. अनेक सामाजिक प्रश्नांना या मालिकेतून वाचा फोडण्यात येते आणि समाजातील काळ्या बाजूचे ज्या तीव्रतेने त्यातून दर्शन घडविले जाते त्यामुळे वादही निर्माण होतात असा अनुभव आहे. मालिकेत हाताळल्या गेलेल्या अनेक गंभीर प्रश्नांत त्रास सोसाव्या लागलेल्यांचे अनुभव पाहून सर्वसामान्यांचे काळीज हलतेच पण आमीरखानही वारंवार भावूक होताना दिसतो. त्यावरून आमीरखान भावूक होण्याचा अभिनय करतो असाही आरोप यापूर्वीही केला गेला आहे.

आमीरखानला सामाजिक प्रश्न हाताळायचे आहेत तर तो या मालिकेतून पैसे कसे कमावतो असाही सवाल यापूर्वीही केला गेला आहे आणि आताही केला जात आहे. मालिकेत आमीर एकच बाजू दाखवितो पण समाजातील ज्या प्रवृत्तींविरोधात आवाज उठविला जातो त्या लोकांना स्पष्टीकरण देण्याची संधी दिली जात नाही म्हणून ही मालिका एकतर्फी वाटते असेही आरोप केले जात आहेत. या मालिकेला जरूरीपेक्षा जादा पब्लिसिटी दिली जात आहे असेही अनेक नामवंतांचे म्हणणे आहे. रविवारी हा कार्यक्रम सादर होतो ती वेळ चुकीची असल्याने मालिका पाहात नाही असे सांगणाराही मोठा वर्ग आहे.

मात्र मालिकेबद्दल आमीर चे म्हणणे असे आहे की जे सत्य समोर येते आहे तेच आम्ही प्रेक्षकांसमोर मांडतो आहोत. मी केवळ कम्युनिकेटर आहे. मी स्वतःला बदलू शकलो तरी माझ्यासाठी मालिकेचे हे मोठे यश ठरेल. सामाजिक प्रश्न मोठे आहेत, ते समजून घेणे, शेअर करणे ही प्रक्रिया सध्या माझ्यात सुरू आहे आणि या मलिकेच्या निमित्ताने समाजाची ही दुखणी मी ६० कोटी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आहे. याचा अर्थ प्रत्येक दोन नागरिकांपैकी १ या समस्या ऐकतो आहे. सामाजिक प्रश्नाबरोबर राजकीय प्रश्नही आहेत आणि त्यावरही चर्चा होणे गरजेचे आहे असे मला वाटते.लोकशाही सृदृढ व्हायची असेल तर अंतर्गत दक्षता ही त्यासाठी मोजावी लागणारी किंमत आहे असे मला वाटते.

माहिती देताना ती कुणाच्या फायद्याची आणि कुणाच्या तोट्याची याचा विचार आम्ही करत नाही असे सांगून आमीर म्हणतो, देशातील प्रत्येक नागरिक सबल व्हावा हा त्यामागचा खरा उद्देश आहे. महिला सबलीकरण हा असाच महत्त्वाचा मुद्दा असून हा मुद्दा समाजासाठी गेम चेंजर ठरेल इतका प्रभावी आहे. कारण महिला घरातील महत्त्वाचे केंद्र आहे आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात तसेच कुटुंबातही ती महत्त्वाची भूमिका बजावत असते. पर्यायाने केवळ तिचे कुटुंबच नव्हे तर समाज, राज्य, देश यांचेही सबलीकरण होण्यास तिचा हातभार लागत असतो.

जिन्हे देश की फिक्र है हे हेडिंग देण्यामागे प्रत्येक भारतीयात सार्वभौमत्व भिनले पाहिजे असा प्रयत्न असल्याचेही आमीर सांगतो. असे असले तरी या मालिकेचे बजेट छोट्या चित्रपटाइतके म्हणजे सुमारे ६.२ कोटी रूपयांचे आहे आणि भारती एअरटेलबरोबर १८ ते २० कोटींचा तर अॅक्सिस बँकेबरोबर १३ कोटींचा जाहिरात करार करून आमीर या मालिकेच्या निमित्ताने व्यवसायच करत असल्याचा अनेकांचा आरोप आहे.

Leave a Comment