युध्दखोरीमुळे रशियाला ६० अब्ज डॉलर्सचा फटका

मॉस्को – युक्रेनमध्ये लष्करी हस्तक्षेप करण्याची रशियाला जबर आर्थिक किंमत मोजावी लागत आहे. अमेरिकेने आधी इशारा दिल्याप्रमाणे रशियाच्या आर्थिक नाडया आवळण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी मॉस्को शेअर बाजार १०.८ टक्क्यांनी कोसळला त्यामुळे रशियन कंपन्यांना ६० अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले.

रशियन चलन रुबलला सावरण्यासाठी मध्यवर्ती बँकेला १२ अब्ज डॉलर मोजावे लागले. रशियाचा पाश्चिमात्य देशांबरोबर जो संघर्ष निर्माण झाला आहे त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रशियाने युक्रेनबद्दलच्या आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर, रशियाला आणखी आर्थिक नुकसान सहन करण्यासाठी तयार रहावे लागेल.

रशियाने युक्रेनचा भाग असललेल्या क्रिमियामध्ये आपल्या फौजा उतरवल्या आहेत. रशियन नागरिकांच्या हितासाठी युक्रेनमध्ये हस्तक्षेप करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असल्याचे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रातील रशियाच्या प्रतिनिधीने रशियाच्या कृतीचे समर्थन केले आहे.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना पत्र पाठवून युक्रेनमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रशियन फौजांना धाडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पुतिन यांनी फौजा पाठवल्याचे या प्रतिनिधीचे म्हणणे होते. रशियाला एकाकी पाडण्यासाठी अजून काय करता येईल याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांबरोबर तब्बल दोन तास चर्चा केली.

Leave a Comment