इस्लामाबाद – पाकिस्तानच्या राजधानीतील सत्र न्यायालयात दहशतवाद्यांनी केलेल्या मानवी बॉम्बच्या स्फोटात आणि ताबडतोब केलेल्या स्वैर गोळीबारात न्यायाधीश आणि काही वकिलांसह ११ जण मारले गेले आणि बरेच जण जखमी झाले. या घटनेत किमान २५ जण जखमी झाले असावेत असा अंदाज आहे. इस्लामाबादच्या या न्यायालयाच्या परिसरात अनेक स्थलांतरित लोक राहतात आणि त्या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त असतो. तरीही तिथे हा प्रकार घडला.
हल्ला करणारे दहशतवादी नेमके किती होते हे समजू शकलेले नाही. मात्र हा स्फोट मानवी बॉम्बने घडवलेला आहे असे दिसते. कारण स्फोटामध्ये दोन दहशतवादी सुद्धा मारले गेले आहेत आणि मारल्या गेलेल्या या अतिरेक्यांच्या शरीराची जी अवस्था झालेली दिसली तिच्यावरून तरी त्यांनी आपल्या शरीराभोवती स्फोटके गुंडाळून घेऊन हा स्फोट घडवला असल्याचे लक्षात आले.
जखमी झालेल्या पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींपैकी बर्याच जणांच्या शरीरावर कमरेच्या वरच्या भागात जखमा झालेल्या आहेत. याचा अर्थ हे लोक स्फोटानंतरच्या गोळीबारात जखमी झालेले आहेत. जखमी आणि मृतांमध्ये तरुण वकिलांची संख्या मोठी आहे. स्फोट झाल्यानंतर काही अतिरेक्यांनी १५ मिनिटे गोळीबार केला.
पाकिस्तानात दहशतवादी संघटनांचा हिंसाचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, परंतु तो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील स्वात प्रांतात सुरू आहे. इस्लामाबाद हे शहर दहशतवादी घटनांपासून सुरक्षित मानले जाते, पण तिथेही स्फोट झाला. इस्लामाबादमध्ये अशी घटना घडण्याचा पहिलाच प्रसंग आहे.