चीनमध्ये दडपशाहीमुळेच हिंसाचार

बीजिंग – चीनमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसक घटनांच्या मागे असलेल्या कारणांचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार असे लक्षात आलेले आहे की, हिंसक घटना घडलेल्या शिंझियांग परगण्यातील उईघूर मुस्लिमांवर दडपशाही केली जात असल्यामुळे ते हिंसेस प्रवृत्त झालेले आहेत. ही दडपशाही थांबत नाही तोपर्यंत उईघूर मुस्लिमांमधील असंतोष कमी होणार नाही असे या संघटनेने म्हटले आहे.

काही उईघूर मुस्लीम देशाबाहेर गेले आहेत, त्यातल्या जर्मनीमध्ये जाऊन राहिलेल्या आणि विस्थापित जीवन जगणार्‍या उईघूर मुस्लिमांनी एक संघटना स्थापन केली असून तिला वर्ल्ड उईघूर कॉंग्रेस असे नाव दिले आहे. ही संघटना चीनच्या सरकारला मान्य नाही. त्यामुळे सरकारने तिला बेकायदा जाहीर केले आहे. मात्र या संघटनेने कालच्या हिंसक घटनेनंतर एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून चीन सरकारने उईघूर मुस्लिमांवरील अत्याचार थांबवावेत अशी मागणी केली आहे.

शिझियांग प्रांतातील उईघूर मुस्लीम आपला धर्म, भाषा आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याबाबत आग्रही आहेत. परंतु त्यास चीनच्या सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही, उलट दडपशाही केली जाते ही त्यांची समस्या आहे आणि त्यातून हा संघर्ष उद्भवला आहे.