ग्रॅमी स्मिथची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

केपटाऊन: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट कर्णधार ग्रॅमी स्मिथने निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिस-या कसोटीनंतर, निवृत्त होत असल्याचे, स्मिथने म्हटले आहे. स्मिथने घेतलेल्या या धक्कादायक निर्णयाने क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

यापूर्वी डिसेंबर महिन्यातच आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू, जॅक कॅलिसने निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर आता स्मिथने निवृत्ती जाहीर केल्याने, आफ्रिकेच्या संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या तिसरा कसोटी सामना सुरू आहे.या कसोटीच्या तिस-या दिवसाच्या खेळानंतर स्मिथने आपला निर्णय सहका-यांना सांगितला. गेल्याय काही दिवसांपासून सुरु असलेल्या मालिकेत स्मिथला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पाच डावात त्याने फक्त ४२ धावा केल्या आहेत. केवळ याच त्याच्या ढासळत्या फॉर्ममुळे स्मिथने हा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता काही जणांनी व्यक्त केली आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना स्मिथने कारकिर्दीत ११७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी तब्बल १०९ सामन्यात स्मिथने आफ्रिकेचे कर्णधारपद भूषवले आहे. इतकेच नाही, तर स्मिथच्या नेतृत्वात आफ्रिकेने ५३ कसोटी जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.

Leave a Comment