इस्टरच्या मारेक-याला अटक

मुंबई – टीसीएस कंपनीची कर्मचारी इस्टर अनुह्या (२३) हिच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये चंद्रभान सानप याला अटक केली आहे. मूळचा नाशिकचा असलेला चंद्रभान सानप याला याआधीही रेल्वे मार्गावर चो-या करणे, दरोडे घालणे अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे. सानपनेच इस्टरची हत्या करुन तिचा मृतदेह कांजूरमार्गच्या खाडीत तिवराच्या जंगलात टाकून दिला होता, असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन पोलिस आणखी माहिती देणार असल्याचे समजते. गोरेगाव येथील टीसीएसच्या ऑफिसमध्ये काम करणारी आणि मूळची हैदराबादची असलेली इस्टर ५ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता कुर्ला टर्मिनस येथे उतरली आणि १६ जानेवारी रोजी तिचा मृतदेह कांजूरमार्गच्या खाडीत कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तपासासाठी पोलिसांनी कुर्ला टर्मिनस स्टेशनचे सीसीटीव्ही फूटेज पाहून एका व्यक्तीचा शोध सुरू केला होता. अखेर ही व्यक्ती चंद्रभान सानप असल्याचे उघड झाले आणि सापळा रचून त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अनुह्या रेल्वे स्टेशानात उतरल्यानंतरचे विशिष्ट मोबाइल टॉवर लोकेशनवरील शेकडो कॉल्स, अनुह्याच्या मोबाइलमधून रिकव्हर केलेल्या डेटा, तिच्या मित्रमंडळींचे आणि संशयीतांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर), सासीटीव्ही अशी ब-याच तांत्रिक बाबी तपासल्यानंतर अखेर पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे सक्रीय केले आणि इस्टरच्या मारेक-याला शोधून काढले. इस्टरचा मृतदेह सापडला त्यावेळी तिच्या अंगावरील कपड्यांची अवस्था पाहून बलात्काराचा संशय व्यक्त होत होता. या प्रकरणी झालेल्या तपासाची माहितीही पोलिस पत्रकार परिषदेत देणार असल्याचे समजते.

Leave a Comment