आंध्रात कॉंग्रेस अस्तंगत

आंध्र प्रदेशाचे विभाजन होऊन तेलंगणाची निर्मिती करण्यात आली. तेव्हा राज्य निर्मितीच्या या प्रक्रियेमध्ये निरनिराळ्या पक्षांनी निरनिराळ्या भूमिका घेतल्या. आता राज्य निर्मिती झाली आहे त्यामुळे आता प्रत्येक पक्षाची वेगळी राजनीती प्रकट व्हायला लागली आहे आणि दोन्ही राज्यातल्या राजकारणाला नवे वळण मिळायला लागले आहे. सकृतदर्शनी दिसणारी एक मोठी गोष्ट म्हणजे तेलंगणामध्ये तेलंगण राष्ट्र समिती (तेरास) आणि सीमांध्रा भागामध्ये वायएसआर कॉंग्रेस हे दोन पूर्णपणे नवे पक्ष उदयाला आले आहेत. एवढेच नव्हे तर दोन्ही भागात त्यांनी सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आपली छाप उमटवली आहे. १९८० पूर्वी आंध्र प्रदेशाच्या राजकारणात कॉंग्रेसचे जबरदस्त वर्चस्व होते. परंतु राजीव गांधींच्या उर्मटपणामुळे तेलुगु अस्मिता दुखावली गेली आणि १९८२ मध्ये एन.टी. रामाराव यांनी तेलुगु देसम हा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून ते अगदी अलीकडे म्हणजे २००९ च्या विधानसभा निवडणुका होईपर्यंतच्या सुमारे पाव शतकाचे राजकारण कॉंग्रेस आणि तेलुगु देसम या दोन पक्षातच होत गेले. भारतीय जनता पार्टीला आंध्र प्रदेशात आपले स्थान निर्माण करता आले नाही. भाकपा आणि माकपा या डाव्या पक्षांनी पूर्वी आंध्राच्या राजकारणात अापले स्थान निर्माण केलेले होते. ते कालांतराने नष्ट झाले आणि आता तर हे दोन्ही पक्ष नगण्य झाले आहेत.

तेलंगण निर्मितीच्या निमित्ताने झालेल्या राजकारणातून दोन नवे पक्ष उदयाला आले आणि दोन जुने पक्ष अस्तंगत होत चालले आहेत. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशातून तेलुगु देसम पक्षाचे ३४ खासदार निवडून आले होते आणि या पक्षाच्या बाहेरच्या पाठिंब्याच्या जोरावरच दिल्लीतले रालो आघाडीचे वाजपेयी सरकार जगले होते. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे चित्र उलटे झाले. कॉंग्रेसचे ३६ खासदार निवडून आले आणि कॉंग्रेस सरकार स्थापन होण्यासाठी ही संख्या निर्णायक ठरली. लोकसभेच्या संख्याबळात एवढे प्रभाव असलेले कॉंग्रेस आणि तेलुगु देसम हे पक्ष आता अस्तित्वाची लढाई लढत आहेत. हा काळाचा तर महिमा आहेच. तेलंगण निर्मितीच्या निमित्ताने झालेल्या राजकारणाचाही महिमा आहे. तेलंगणातले लोक तेलंगणवादी तर सीमांध्रातले लोक तेलंगणविरोधक असे परस्पर विरोधी चित्र या दोन्ही राज्यात आता निर्माण झाले आहे. या दोन्ही राज्यातल्या या भावना एवढ्या तीव्र आहेत की तेलंगणामध्ये सातत्याने तेलंगणवादी भूमिका घेणारा तेरास हा पक्ष प्रभावी ठरणार आहे आणि सीमांध्रा भागामध्ये सातत्याने तेलंगणविरोधी भूमिका घेणारा वायएसआर कॉंग्रेस हा पक्ष ओघानेच प्रचंड प्रभाव दाखवणार आहे.

असे प्रादेशिक पक्ष टोकाची प्रादेशिक भूमिका घेऊ शकतात. राष्ट्रीय पक्षांची ती मर्यादा असते. त्यामुळेच कॉंग्रेसची गोची झाली आहे. कॉंग्रेसने तेलंगणवादी भूमिका घेतली त्यामुळे सीमांध्रा भागात हा पक्ष भूईसपाट होण्याची शक्यता आहे. आता त्यातल्या त्यात निदान तेलंगणात तरी आपले स्थान टिकावे म्हणून कॉंग्रेस पक्षाने तेलंगणामध्ये तेरास पक्षाशी युती करण्याचा प्रयत्न चालवला आहे. लोकसभेच्या १७ जागा आणि विधानसभेच्या ११९ जागा असलेल्या या नव्या राज्यामध्ये कॉंग्रेसला एका छोट्या प्रादेशिक पक्षाच्या नाकदुर्‍या काढाव्या लागत आहेत. कॉंगे्रसच्या नेत्यांनी तेरासचे नेते के. चंद्रशेखर राव यांना गृहित धरूनच हा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होईल अशी भुमका उठवली होती. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी तर एक दोन दिवसात हा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होऊन जाईल अशी घोषणाच केली होती. शक्यता तशी वाटतही होती परंतु ज्यांच्यामुळे तेलंगण निर्मिती शक्य झाली आहे ते चंद्रशेखर राव मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून आहेत. म्हणूनच विलिनीकरण होईल पण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून चंद्रशेखर राव यांचे नाव जाहीर केले पाहिजे अशी अट तेरास पक्षाच्या नेत्यांनी घातली. कॉंग्रेस पक्षाची ही तर अडचण आहे.

त्यांनी निवडणुकीच्या मैदानात आगामी मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करायचे नाही असा ठाम निर्णय घेतलेला आहे. परिणामी तेरास या पक्षाची अट कॉंग्रेसने मान्य केलेली नाही. त्यामुळे तेरास आणि कॉंग्रेस यांचे एकत्रिकरण किंवा तेरासचे कॉंग्रेसमध्ये होणारे विलिनीकरण आता होणार नाही असे जाहीर झाले आहे. कॉंगे्रस पक्षाला एक छोटा पक्ष अटी घालतो ही वस्तुस्थिती कॉंग्रेसच्या दृष्टीने विचार करायला लावणारी आहे. सीमांध्रा भागात तर कॉंग्रेस पक्षाचे काय होणार आहे. हे सांगता येत नाही. कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत. त्यातले काही पदाधिकारी तेलुगु देसम पक्षात प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्या नव्या पक्षाचा पाळणा अजून हललेला नाही. जगनमोहन रेड्डी मात्र फॉर्मात आहेत. तेलुगु देसम पक्षाची अवस्थासुध्दा थोड्याफार प्रमाणात कॉंग्रेससारखीच झालेली आहे. या पक्षाचे तेलंगणातले कार्यकर्ते तेरासमध्ये प्रवेश करत आहेत परंतु सीमांध्रा भागात मात्र कॉंग्रेसचे कार्यकर्ते तेलुगु देसममध्ये येत आहेत. म्हणजे सीमांध्रा भागात तेलुगु देसमचे नेते चंद्राबाबु नायडू हे आपला प्रभाव काही प्रमाणात दाखवतील असे दिसते. भारतीय जनता पार्टीला मात्र सीमांध्रा भागात प्रचंड विरोध आहे आणि तेलंगणात थोड्याशा आशा आहेत.

Leave a Comment