न्यूयॉर्क – वारंवार चार्ज कराव्या लागणार्या स्मार्टफोन बॅटरीपासून सुटका मिळण्याची संधी युजरला लवकरच मिळणार आहे. एकदा चार्ज केल्यावर किमान दहा दिवस चालू शकेल अशी बॅटरी विकसित करण्यात संशोधकांना यश आले असून ही बॅटरी साखरेवर चार्ज होणार आहे. व्हर्जिनिया पॉलिटेक्निक स्टेट युनिव्हर्सिटीतील झिगुआंग झू या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. बायो बॅटरी असे त्याला संबोधले गेले आहे.
आपल्या शरीरात ज्याप्रमाणे पचनक्रियचे कार्य होते, त्यानुसारच बॅटरी चार्जिंगचे काम होणार असल्याचे झू यांचे म्हणणे आहे. यात साखरेचे उर्जेत रूपांतर होणार आहे व त्यातून इलेक्ट्रोन उर्त्सर्जित करताना त्याचे कार्बन डाय ऑक्साईड आणि पाणी यात रूपांतर होणार आहे. सध्या वापरात असलेल्या लिथियम आयन बॅटरीपेक्षा या बॅटरीची क्षमता अधिक असेल. सध्याच्या बॅटरीज चार्जिंग नंतर १ दिवस चालतात तर ही बॅटरी १० दिवस पुरी शकेल असा झू यांचा दावा आहे. भविष्यात साखरेचा वापर इंधन म्हणून करणे शक्य असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.