लोकसभेच्या रिंगणातून मनसेची माघार?

मुंबई – लोकसभा निवडणुकीत मतांची विभागणी टाळण्यासाठी मनसेने लोकसभा निवडणूकच लढवू नये अशी विनंती भाजपने राज ठाकरे यांना केली असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यात मुंबईत एका हॉटेलमध्ये चर्चा झाली. लोकसभा निवडणूक न लढविण्याची मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विनंती केली असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी माध्यमांना दिली.

कायम गुजरातची टिमकी वाजवणे आणि महाराष्ट्रात आल्यानंतर बाळासाहेबांचे नाव न घेणे या मुद्दयांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना सुनावले होते. त्यानंतर भाजप आणि मनसे यांच्यात थोडा दुरावा आला होता. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यात एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये भेट झाली. या वेळी निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांकडून देण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.

या भेटीच्यावेळी आशिष शेलार हे देखील उपस्थित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आशिष शेलार यांनी राज-गडकरी यांच्यात अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगितले आहे. मात्र या वृत्ताने शिवसेनेत नाराजी पसरल्याचे समजते. दरम्यान, या आधी नाशिक मधील गोदापार्क प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकत्र आले होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला तर त्याचं स्वागत असल्याचं रिपाई नेते रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment