उंची राहणीमुळे अस्थमाचा धोका

मुंबईच्या काही भागांमध्ये उद्योगधंद्यांची एवढी गर्दी झाली आहे की, त्यामुळे हवेचे कमाल प्रदूषण झाले आहे. चेंबूरसारख्या उपनगरांना त्यामुळेच गॅस चेंबर म्हटले जाते. त्यामुळे या प्रदूषित भागात राहणार्‍या लोकांमध्ये श्‍वसनसंस्थेचे काही विकार बळावताना दिसतात. हे झाले बाहेरच्या प्रदूषित हवेचे. परंतु उच्च दर्जाच्या राहणीमाना मुळेही श्‍वसनसंस्थेच्या विकारामध्ये वाढ होत असल्याचे मुंबईच्या काही तज्ज्ञांना दिसून आले आहे. मुंबईसारख्या शहरात आज वातानुकूलित यंत्रणा असलेले घर ही गोष्ट ङ्गार सामान्य झालेली आहे. परंतु या यंत्रणा नीट वापरल्या नाहीत आणि त्यांच्या बाबतीत असलेली पथ्ये नीट पाळली नाहीत तर त्यांच्या पासून अस्थमा किंवा ऍलर्जीसारखे श्‍वासाशी संबंधित विकार बळावल्याखेरीज रहात नाहीत. अनेक लोक रात्री झोपताना ए.सी. चालू करून झोपतात. रात्रभर ए.सी. सुरू राहतो.

या लोकांची झोप संपते तेव्हा ते आंघोळ वगैरे आटोपून घर सोडतात आणि घर सोडताना ए.सी. बंद करतात. रात्रभर ए.सी. सुरू असताना घराच्या खिडक्या उघडण्याचा प्रश्‍नच नसतो. कारण ए.सी. हा दारे-खिडक्या बंद करून चालवायचा असतो. परंतु सकाळी ए.सी. बंद केल्यानंतर काही वेळ तरी घराच्या खिडक्या उघडल्या गेल्या पािहजेत. त्यावेळेस त्या उघडल्या गेल्या नाहीत तर ही मंडळी कामावर जातात त्याही वेळी खिडक्या बंदच राहतात. अशा रितीने घराची खिडकी २४ तास बंद राहते. रात्री ए.सी.चा वापर झाल्याने ए.सी. वापरलेल्या खोलीमध्ये काही विशिष्ट प्रकारची बुरशी जमा होत असते. २४ तास खिडकी बंद राहिल्याने त्या बुरशीला अनुकूल वातावरण मिळते आणि ती वाढत राहते. त्या ऐवजी जमेल तितका वेळ खिडकी उघडी ठेवली तर मोकळ्या हवेने ही बुरशी मरून जात असते. पण ए.सी. वापरणारे श्रीमंत लोक खिडकी कायमचीच बंद ठेवतात आणि ए.सी.च्या कानाकोपर्‍यामध्ये साचलेल्या बुरशीने त्यांना अस्थमाचा विकार जडण्याची शक्यता असते. अशा लोकांना रात्री खूप खोकला येतो आणि पहाटेच्या वेळपर्यंत तो टिकतो.

घराच्या बाहेर पडल्यानंतर या खोकल्याचे प्रमाण थोडे कमी होते, परंतु घरी येऊन ए.सी. सुरू करताच पुन्हा खोकल्याची उबळ सुरू होते. हा झाला ए.सी.चा प्रकार. अशाच रितीने धुळीने सुद्धा अस्थमाचा विकार जडावण्याची शक्यता असते. मुंबई हे काही थंड हवेचे ठिकाण नाही आणि अस्थमाचा विकार मुंबईसारख्या दमट हवेपेक्षा थंड हवेच्या ठिकाणी बळावण्याची जास्त शक्यता असते. असे असूनही मुंबईत अस्थमा वाढत चाललेला आहे. याचे कारण राहणीमानात झालेला हा बदल हे आहे. मुंबईच्या के.ई.एम. हॉस्पिटलमधील चेस्ट मेडिसीन ऍन्ड एन्व्हायरनमेंटल पोल्युशन रिसर्च सेंटर या संंशोधन विभागाने केलेल्या पाहणीमध्ये ही गोष्ट आढळली आहे. त्यांनी अंधेरी, खार आणि बोरिवली या तीन उपनगरा तील ५४० रुग्णांची सविस्तर माहिती काढली तेव्हा त्यांना ही गोष्ट आढळली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही