सेनेला कोल्हापूरचा उमेदवार अखेर मिळाला

मुंबई – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत शिवसेना नेतृत्वाला पडलेला पेच आज कॉंग्रेसचे सहयोगी खासदार सदाशिव मंडलिक यांचे पुत्र प्राध्यापक संजय मंडलिकांमुळे सुटला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, परत कॉंग्रेस असा प्रवास करत संजय मंडलिक यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय मंडलिक यांनी गेल्या आठवड्यात शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांना उद्धव यांची भेट मिळाली नव्हती.

मंडलिक यांच्या प्रवेशाबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे नाराज असल्याची चर्चा असल्यानेच ही भेट दिली नसल्याची चर्चा होती. मात्र देवणे यांच्याबरोबर उद्धव यांनी आज संवाद साधल्यानंतर अखेर मंडलिक यांचा शिवसेना प्रवेश सुकर झाला. मातोश्रीवर जाऊन संजय मंडलिक यांनी उद्धव यांची भेट घेऊन शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई आदी उपस्थित होते. विद्यमान खासदार सदाशिव मंडलिक लोकसभा लढविण्यास तयार नसल्याने संजय मंडलिक यांना शिवसेनेचे तिकीट मिळाल्याचे मानले जात आहे. शिवसेनेने शुक्रवारी राज्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. या वेळी कोल्हापूरच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते. कोल्हापूरमधून पक्षाच्या निष्ठावंताला संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र शिवसेना नेतृत्वाला दिल्लीत जास्तीत जास्त ताकदीने जायचे असल्याने निवडून येण्याची क्षमता या निकषावर संजय मंडलिक यांचे पारडे जड झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत होण्याची शक्‍यता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बेबनाव झाला होता. एकाच वेळी या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी दावा केला होता. आज मातोश्रीवर झालेल्या चर्चेनंतर माढ्यासाठी खोत आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांची अखेर निवड निश्‍चित झाली आहे. विशेष म्हणजे युतीच्या जागावाटपानुसार भाजपच्या ताब्यात असलेल्या बारामतीमधून माधव भंडारी यांच्यासाठी भाजप नेते आग्रही होते. मात्र, जानकर यांचे नाव निश्‍चित झाल्याने, राज्यसभेची जागा रामदास आठवले यांना दिल्यानंतर महायुतीच्या ऐक्‍यासाठी भाजपला पुन्हा एकदा त्याग करावा लागल्याने पक्षामध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Comment