रुग्णालयामुळे आजारी

भारतामध्ये लोकांच्या मृत्यूची कारणे काय आहेत, याचा बारकाईने अभ्यास केला असता असे आढळले आहे की, कर्करोग, अपघात, हृदयविकार ही तर मृत्यूची प्रमुख कारणे आहेतच. पण रुग्णालयातील अस्वच्छता आणि त्यातून होणारे निरनिराळ्या प्रकारचे संसर्ग हे सुद्धा मृत्यूचे एक मोठे कारण आहे, असेही दिसून आले आहे. रुग्णालयातील कारणांमध्ये चुकीचे इंजेक्शन देणे हे एक मोठे कारण आहे. माणूस आजार बरा व्हावा म्हणून रुग्णालयात दाखल होतो. तिथे त्याचा आजार बरा होतो परंतु आजार बरा होऊन तिथल्याच संसर्गाने तो मरत असेल तर ती एक विसंगतीच म्हटली पाहिजे. रुग्णालयातील सामान्य रुग्णांना अशा संसर्गापासून वाचवता येणार नाही. म्हणून एखाद्या रुग्णाला अति दक्षता विभागात दाखल केले जाते. परंतु अति दक्षता विभाग सुद्धा याबाबतीत म्हणावा तेवढा सुरक्षित नाही, असे आता दिसून आले आहे. अति दक्षता विभागात दाखल झाल्यानंतर सेप्सीस नावाचा विकार होतो. कोणत्याही दवाखान्याच्या अशा विभागात दाखल होणार्‍या चार रुग्णांपैकी एकाला सेप्सीस होतो आणि सेप्सीस झालेल्या दोन रुग्णांपैकी एक जण या आजाराने मरण पावतो.

डॉक्टरांच्या संघटनेने केलेल्या एका पाहणीतच हे कटु सत्य समोर आले आहे. इंडियन इन्टेन्सिव्ह केअर केस मिक्स ऍन्ड प्रॅक्टिस पॅटर्नस् असे या पाहणीचे नाव होते. या पाहणीमध्ये १७ राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये जाऊन ही पाहणी करण्यात आली. १२४ रुग्णालयांच्या अति दक्षता विभागातील ४२०० रुग्णांचा मागोवा घेण्यात आला. त्यात १७१ मुले होती. या रुग्णांतील २६ टक्के रुग्णांना सेप्सीस झाल्याचे आढळले आणि सेप्सीस झालेल्या रुग्णांमध्ये ४२ टक्के रुग्ण मरण पावतात, असे दिसून आले. अति दक्षता विभागातील रुग्णांच्या या दुरावस्थेमागे तीन मुख्य कारणे असावीत असा अंदाज आहे. रुग्णालयातील अस्वच्छता हे एक प्रमुख कारण आहेच. पण अति दक्षता विभागात दाखल केलेल्या रुग्णाला अति उपचार करून बेजार केले जाते आणि त्या अति उपचारामध्ये ऍन्टिबायोटिक औषधांचा जास्त मारा केला जातो. हा अतिरेकी वापर हेही एक कारण असावे, असा या पाहणीचा निष्कर्ष आहे.

या दोन्ही कारणांची जबाबदारी प्रामुख्याने रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर पडते. परंतु या मृत्यूमागचे तिसरे कारण मात्र रुग्णांमुळेच घडते. अनेक रुग्ण स्वत:च्या मनाने औषधे घेत असतात. सामान्य माहितीच्या आधारावर ही मंडळी हे धाडस करत असतात आणि त्यातूनही त्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊन त्यांना मृत्यू येत असावा, असा अंदाज आहे. सेप्सीस हा विकार ङ्गार धोकादायक आहे. कारण त्यामध्ये शरीरातले काही अवयव निकामी होत असतात. आजवर साधारणत: असे मानले जात होते की, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते. परंतु सेप्सीस झालेल्या रुग्णांची सविस्तर पाहणी केली असता असे आढळले की, त्यामध्ये शस्त्रक्रिया न केलेल्या रुग्णांचीच संख्या जास्त होती.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment