पाकिस्तानची भारतावर थरारक मात

मिरपूर- मोठे आव्हान नसूनही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रविवारी झालेली लढत रंगतदार झाली. शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी १० धावा असताना अष्टपैलू शाहीद आफ्रिदीने सलग दोन षटकार ठोकत पाकिस्तानला एका विकेट आणि दोन चेंडू राखून थरारक विजय मिळवून दिला. या विजयासह गतविजेत्यांनी नऊ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. भारताच्या २४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अहमद शहझाद (४२) आणि शरजील खाने (२५) पाकिस्तानला ७१ धावांची सलामी देत पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार मिसबा-उल हक (१) आणि फॉर्मात असलेला उमर अकमलला (४) लवकर बाद करत भारताच्या फिरकीपटूंनी सामन्यात रंग भरला.

ऑफस्पिनर आर. अश्विनसह लेगस्पिनर अमित मिश्रा आणि डावखुरा रवींद्र जडेजाने प्रभावी मारा केला तरी ‘वनडाउन’ मोहम्मद हफीझने (७५) एक बाजू लावून धरली. सोहेब मकसूदसह (३८) पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करताना त्याने पाकिस्तानचे द्विशतक फलकावर लावले. हफीझने १९वे अर्धशतक झळकावताना ३ चौकार आणि २ षटकार मारले. हफीझ आणि मकसूद ही स्थिरावलेली जोडी फोडण्यात शेवटच्या षटकापर्यंत लढत खेचण्यात भारताला यश आले. तळातील फलंदाज झटपट परतले तरी अष्टपैलू शाहीद आफ्रिदीने (१८ चेंडूंत नाबाद ३४ धावा) आपल्या स्टायलीत पाकिस्तानला जिंकून दिले. त्याने छोटेखानी खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. भारतातर्फे अश्विनने तीन तसेच भुवनेश्वर कुमार आणि अमित मिश्राने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला आमंत्रित करण्याचा निर्णय पाकिस्तानसाठी योग्य ठरला. सलामीवीर रोहित शर्मासह (५६) मधल्या फळीतील अंबाती रायुडू (५६) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या (नाबाद ५२) दमदार खेळीनंतरही भारताला ८ बाद २४५ धावाच करता आल्या. मागील दोन लढतीत अपयशी ठरलेला मुंबईकर रोहित शर्माला (५८ चेंडूंत ५६ धावा) सूर गवसला तरी अन्य सलामीवीर शिखर धवन (१०) आणि फॉर्मात असलेला कर्णधार विराट कोहलीला (५) लवकर माघारी धाडताना मोहम्मद हफीझ आणि उमर गुलला यश आले. रोहित शर्माच्या २२व्या अर्धशतकात ७ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणेने (५० चेंडूंत २३ धावा) खेळपट्टीवर थांबण्याचे थोडे धाडस दाखवले तरी झटपट धावा करण्यात त्याला अपयश आले.

पाचव्या क्रमांकावरील रायुडूने दिनेश कार्तिकसह (४६ चेंडूंत २३ धावा) पाचव्या विकेटसाठी आणि जडेजासह सहाव्या विकेटसाठी अनुक्रमे ५२ आणि ५९ धावांची धावांची भागीदारी भारताला सावरले. रायुडुने दुसरे अर्धशतक मारताना ४ चौकार आणि एका षटकार लगावले. त्याच्यानंतर जडेजाच्या फटकेबाजीमुळे भारताला अडीचशेच्या घरात पोहोचता आले. त्याने नववे अर्धशतक झळकावले. त्यात ४ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. पाकिस्तानतर्फे ऑफस्पिनर सईद अज्मल (४०-३) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याला मोहम्मद ताल्हा (२२-२) आणि मोहम्मद हफीझजी (३८-२) चांगली साथ लाभली. पाकिस्तानतर्फे मध्यमगती ताल्हाने आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना छाप पाडली. अन्वर अलीच्या जागी त्याला संधी मिळाली.

Leave a Comment