निम्मी अफगाण सेना अशिक्षित

काबूल – शिक्षणासाठी प्रंचड मोठी गुंतवणूक केल्यानंतर आणि शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतरही अफगाणिस्तानातील मिम्म्याहून अधिक सैनिक अशिक्षत किंवा अडाणीच राहिले असल्याचे अमेरिकन एजन्सीच्या पाहणीत आढळून आले आहे. यामुळे सैन्याच्या आधुनिकीकरणात मोठाच अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैनिकांना शिक्षित करण्यासाठी २०११ सालापासून साक्षरता कार्यक्रम राबविला असून त्यासाठी मोठी गुंतवणूकही केली आहे. २० कोटी डॉलर्स इतकी गुंतवणूक या कार्यक्रमासाठी केली गेली आहे. यानुसार २०१४ मध्ये अमेरिकन सैन्य तेथून बाहेर पडेपर्यंत अफगाणी सेनेतील सैनिकांना किमान वर्णमाला, १ हजार पर्यंतचे आकडे आणि छोटे छोटे शब्द यावेत असे प्रयत्न केले जात आहेत. मात्र गेली ३ दशके देशांतर्गत युद्धामुळे येथील नागरिकांना शाळेत जाताच आलेले नाही. आता या सैनिकांचे वयही शिकण्याचे राहिलेले नसल्याने झपाट्याने साक्षर होणे अवघड जात आहे असे सांगितले जात आहे. त्यातून अफगाणिस्तानातील जे सैनिक शिक्षणात चांगली प्रगती दाखवित आहेत, त्यांना बाहेर नोकरी मिळत असल्याने सैन्यातून बाहेर पडणार्‍या सैनिकांचे प्रमाणही मोठे आहे. यामुळे शिक्षित सैनिकांची संख्या वाढणे अवघड बनले आहे. अफगाण सैन्यातील १/३ सैनिकांना लिहिता वाचता येत नाही.यामुळे अमेरिकेने हाती घेतलेले हे शैक्षणिक कार्य पुरे करणे असंभव असल्याचे अमेरिकेचे सेनाधिकारी सांगत आहेत.