बोलवायचे होते हजार, बोलावले ६० हजार

स्टॉकहोम – स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे घडलेली ही घटना. आपल्यासारखेच तिकडेडी एम्प्लॉयमेंट एक्स्जेंच आहे आणि गोंधळ केवळ आपल्याकडेच घडतात असे नाही तर स्वीडन सारखा प्रगत देशातही घडतात.

तेथील एम्प्लॉयमेंट एक्स्जेंचकडे म्हणजे रोजगार सेवा कार्यालयाकडे नोकरीसाठी कांही जागा भरायच्या होत्या. त्यासाठी १ हजार उमेदवारांना ईमेल करून बोलावले गेले मात्र संगणकातील गोंधळ म्हणा अथवा ईमेल पाठविणार्‍या इसमाची चूक म्हणा, नोकरीच्या मुलाखतीसाठी या अशी मेल तब्बल ६१ हजार जणांना पाठविली गेली आणि हे सर्व उमेदवार मोठ्या आशेने केंद्रात आले. मात्र त्यामुळे इतकी गर्दी झाली की या केंद्राकडे जाणार्‍या वाटा गर्दीने ओसंडल्या आणि अनेकांवर चेंगरण्याची पाळी आली. जमलेल्या उमेदवारांत इतका गोंधळ माजला की अखेर पोलिसांना मदतीसाठी बोलवावे लागले.

या प्रकारात नक्की चूक कोणाची याचा तपास केला जात आहे. त्यातून  चूक कोणाची हे कळेलही पण नोकरी मिळणार या आशेने आलेल्या हजारो बेरोजगारांची जी निराशा झाली त्याची भरपाई कशी होणार असा सवाल केला जात आहे. स्वीडनमध्ये बेरोजगारांचे प्रमाण ८.६ टक्के इतके आहे.