दहावीची परीक्षा उद़यापासून

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नवीन अभ्यासक्रमानुसार २० हजार ७२३ शाळांमधील १५ लाख ५८ हजार ६३९ तर जुन्या अभ्यासक्रमानुसार एक लाख ६९ हजार ७२९ असे एकूण १७ लाख २८ हजार ३६८ विद्यार्थी बसणार आहेत. यात नऊ लाख ६७ हजार ७१४ विद्यार्थी तर सात लाख ६० हजार ६५४ विद्यार्थिनी आहेत.

आगामी काळात राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळाच्या चार हजार ८०२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्यात दहावीची सुरळीत आणि कॉपीमुक्त होण्यासाठी प्रत्येक मंडळाने प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके, विशेष भरारी पथके आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथके नेमली आहेत. हॉल तिकिटांमध्ये त्रुटी आढळल्यास त्यावरील दुरुस्ती करण्यासाठी खास पर्यवेक्षक परीक्षा केंद्रावर असतील, अशी माहिती शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

यावर्षीपासून दहावीची परीक्षा ही पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार घेण्यात येत आहे. नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी परीक्षा केंद्रे ठेवली आहेत. तसेच पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार यंदाची ही परीक्षा ६०० गुणांची आहे. यामुळे गणित, सामान्य विज्ञान हा विषय १५० ऐवजी १०० गुणांचा करण्यात आला आहे.

Leave a Comment