भारताचे सौर अवकाशयान २०२० साली सोडणार

नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संघटनेने मंगळावर अवकाशयान पाठविल्यानंतर आता सूर्याच्या संशोधनासाठी अवकाशयान पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. या मोहिमेचे नाव आदित्य-१ असे आहे आणि ती मोहीम २०२० साली सुरू होईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन् यांनी चेन्नईत पत्रकारांशी बोलताना दिली. मंगळाचे संशोधन करण्यासाठी मंगळावर अवकाशयान पाठवले जाते, परंतु सूर्याची उष्णता भयंकर असल्यामुळे आदित्य-१ हे अवकाश यान सूर्यावर किंवा सूर्याच्या कक्षेत जाणार नाही, ते पृथ्वीच्या भोवतीच प्रदक्षिणा घालत राहील आणि तिथून सूर्याविषयीचे संशोधन करेल.

त्यासाठी या अवकाशयानावर काही विशिष्ट साधने बसविण्यात येणार आहेत. त्यासंबंधीची तयारी २०१७ साली सुरू होईल. २००८ साली भारताच्या एका अवकाश यानाने सूर्याच्या प्रभेचा अभ्यास केला होता. त्यानुसार या प्रभेमध्ये दहा लाख डिग्री सेल्सियस तापमान असल्याचे आढळले होते. याच परिसरामध्ये सौर वादळे येतात आणि त्या वादळांमध्ये वार्‍याचा वेग दर सेकंदाला एक हजार कि.मी. एवढा असतो असे आढळले. ही माहिती देतानाच डॉ. राधाकृष्णन् यांनी त्यावर बसविल्या जाणार्‍या उपकरणांची माहिती दिली.

पूर्वी या मोहिमेचा खर्च एक कोटी डॉलर्स एवढा होईल असा अंदाज काढण्यात आला होता. परंतु आता तो दुरुस्त करण्यात आला असून तो दोन कोटी डॉलर्स होणार असे दिसून आले आहे.