श्रीलंकेचा भारतावर विजय

फातुल्ला- भारतावर दोन विकेटनी मात करत श्रीलंकेने आशिया चषकात सलग दुसरा विजय नोंदवला. अनुभवी कुमार संगकाराच्या (८४ चेंडूंत १०३ धावा) सर्वोत्कृष्ट शतकामुळे २६५ धावांचे आव्हान त्यांनी चार चेंडू राखून पार केले. सलग दुस-या विजयासह श्रीलंकेने अव्वल स्थानी झेप घेतली.

दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी प्रभावी गोलंदाजी केली तरी लंकेचे स्पिनर सरस ठरले. फलंदाजीत दोन डावखुरे फलंदाज चांगले खेळले. मात्र संगकाराची संयमी आणि उपयुक्त खेळी श्रीलंकेला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली. लहिरी थिरिमने आणि कुशल परेराच्या ८० धावांच्या सलामीनंतर संगकाराने परेरासह दुस-या विकेटसाठी केलेल्या ५४ धावांच्या भागीदारीने श्रीलंकेला सावरले. मात्र मधली फळी कोसळल्यानंतर संगकाराने एक बाजू लावून धरताना सातव्या आणि आठव्या विकेटसाठी अनुक्रमे ३३ आणि ४२ धावा जोडताना संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. संगकाराने १८ वे शतक झळकावताना १२ चौकार आणि एका षटकार लगावले.

तत्पूर्वी, सलामीवीर शिखर धवनच्या ९४ धावांच्या चमकदार खेळीनंतरही जादुई फिरकीपटू अजंठा मेंडिस (४ विकेट) ऑफब्रेक सचित्र सेनानायकेच्या (३ विकेट) प्रभावी मा-याने श्रीलंकेने भारताला ९ बाद २६४ धावांवर रोखले. वेगवान गोलंदाज लसित मलिंगाकडून भारताला मोठा धोका वाटत होता. मात्र त्याची गोलंदाजी खेळून काढण्यात फलंदाजांना यश आले. परंतु, फिरकीपटूंसमोर भारताच्या विकेट पडल्या.

धवनने एक बाजू लावून धरली तरी रोहित शर्मा (१३) पुन्हा लवकर बाद झाला. आत्मविश्वासपूर्ण वाटत नसला तरी डावखुरा शिखरने कर्णधार विराट कोहलीसह (४८) दुस-या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करताना भारताला सुस्थितीत आणले. कोहलीनंतर अजिंक्य रहाणेची (२२) त्याला ब-यापैकी साथ लाभली. अजिंक्य परतला तेव्हा ३५.१ षटकांत ३ बाद १७५ अशा चांगल्या स्थितीत भारत होता. शेवटच्या १५ षटकांत प्रति षटकामागे सहा धावा जमवण्यात यश आले तरी सहा विकेट पडल्याने पावणेतीनशेही धावाही भारताला करता आल्या नाहीत.

मधल्या फळीत अंबाती रायडू (१८), दिनेश कार्तिक (४) आणि स्टुअर्ट बिन्नीला (०) लंकेचा मारा खेळून काढता आला नाही. अष्टपैलू रवींद्र जडेजा (नाबाद २२),आर. अश्विन (१८) आणि मोहम्मद शामीमुळे (नाबाद १४) भारताला ९ बाद २६४ धावांची मजल मारता आली. संक्षिप्त धावफलक : भारत – ९ बाद २६४ (धवन ९४, कोहली ४८, मेंडिस ६०-४, सेनानायके ४१-३) वि. श्रीलंका – ४९.२ षटकांत ८ बाद २६५ (संगकारा १०३, परेरा ६४, जडेजा ३०-३, शामी ७७-३, अश्विन ४२-२), निकाल : श्रीलंका दोन विकेटनी विजयी. सामनावीर : कुमार संगकारा

Leave a Comment