पेपर तपासणीवरील शिक्षकांचा बहिष्कार मागे

मुंबई – राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर राज्यातल्या शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लांबणीवर पडणार होते.

राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे विविध प्रलंबित प्रश्न आणि वेतन श्रेणीत वाढ करावी तसेच ७१ ची पटसंख्या कमी करावी या मागणीसाठी राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने दहावी बारावीच्या परीक्षांचे पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. या प्रकरणी सरकारने कायम विनाअनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील कायम हा शब्द यापूर्वीच काढून टाकला आहे. शुक्रवारी शिक्षणमंत्री दर्डा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर शिक्षकांच्या अन्य मागण्याही मान्य करण्यात आल्याने शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतला आहे.

दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा. अनिल देशमुख यांनी आपण बहिष्कार मागे घेत आहोत, असे स्पष्ट केले. मात्र उर्वरित मागण्यांसाठी सरकारला आम्ही काही दिवसांचा अवधी दिला असून त्यावर निर्णय झाला नाही तर त्यावर पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल असेही सांगितले. आमदार मोते, आमदार भगवानराव साळुंखे आदींनी शालेय शिक्षण मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment