कोहली आता सचिन, अझरुद्दीन यांच्या क्लबमध्ये

ढाका: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अझरुद्दीन यांच्या क्लबमध्ये टीम इंडियाचा युवा फलंदाज विराट कोहली सहभागी झाला आहे. विराट कोहलीने सलग १०० आंतरराष्ट्रीय वन डे सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम केवळ सचिन तेंडुलकर आणि मोहमंद अझरुद्दीनला करता आला आहे.

टीम इंडियाचा युवा फलंदाज असलेल्याआ कोहलीने २५ ऑगस्ट २०१० मध्ये न्यूझीलंडमधील वन डे सामन्यानंतर, सलग शंभर वन डे सामने खेळले आहेत. या १०० सामन्यांतील ९६ खेळींमध्ये विराटने ५५.४५ च्या सरासरीने ४५४७ धावा केल्या. ज्यामध्ये १७ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. वन डे सामन्यात सध्या कोहलीच्या नावावर १९ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे.

एकाच संघाकडून सलग सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने २५ एप्रिल १९९० पासून ते २४ एप्रिल १९९८ पर्यंत भारतासाठी सलग १८५ सामने खेळले आहेत. याशिवाय टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही भारताकडून सलग १२६ सामने खेळले आहेत. कोहली सलग १०० वन डे सामने खेळणारा जगातील १३ वा क्रिकेटर ठरला आहे. श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने आपल्या करिअरमध्ये दोन वेळा अशी कामगिरी केली आहे. आता आगामी काळात सचिनचा विक्रम विराट कोहली मागे टाकणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment