विश्वचषक स्पर्धेत युवा टीम इंडिया पाचव्यास्थानी

दुबई – टीम इंडियाच्या १९ वर्षांखालील युवा संघाने विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजवर ४६ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे टीम इंडियाला या स्पार्धेतील पाचवे स्थान मिळाले. अंकुश बैन्स (७४), संजू सॅमसन (६७) आणि श्रेयस अय्यर (६६)यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर भारताच्या १९ वर्षांखालील संघाने विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजवर ४६ धावांनी विजय मिळवला.

टीम इंडियाने सुरुवातीला फलंदाजी करताना दिलेल्या ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा डाव २९४ धावांत संपुष्टात आला. अर्धशतक झळकावणारा अंकुश बैन्स सामनावीर ठरला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ८ बाद ३४० धावा काढल्या. सलामीवीर अंकुश बैन्स (७४) आणि अखिलने (२७) ७० धावांची दमदार सलामी दिली. विजय झोलने ३० धावा काढल्या. संजू सॅमसनने ७२ चेंडूंचा सामना करताना २ चौकार व पाच षटकार खेचत शानदार ६६ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने ६६ व दीपक हुडाने ४२ धावा काढल्या.

भारतीय संघाचा कर्णधार विजय झोलने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने ३२ चेंडूंचा सामना करताना ४ चौकारांच्या मदतीने ३० धावा काढल्या त्याने एक षटकात तीन धावा देत एक बळीदेखील घेतला. त्याने विंडीजतर्फे शतक ठोकणा-या सलामीवीर टी. चंद्रपॉलला पायचीत करत महत्त्वपूर्ण विकेट घेतली.

Leave a Comment