विधान परिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर

मुंबई- आगामी काळात होत असलेल्या विधान परिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांनी विद्यमान सदस्य डॉ. नीलम गो-हे आणि युवा सेनेचे प्रवक्ते अॅड. राहुल नार्वेकर या दोघांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दोघांच्या नावाची घोषणा केली आहे.

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २० मार्चला निवडणूक होत आहे. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, जयप्रकाश छाजेड, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, किरण पावसकर, राणा जगजितसिंग, संजय पाटील, भाजपचे विनोद तावडे, पांडुरंग फुंडकर आणि शिवसेनेच्या डॉ. गोर्हेह हे सदस्य २० एप्रिलला निवृत्त होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक होत आहे.

शिवसेनेने डॉ. गोर्हे यांना तिस-यादा संधी दिली आहे. तर नार्वेकर हे युवा सेनेचे प्रवक्ते असून त्यांच्यावर शिवसेनेचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी आहे. या निवडणुकीत विजयासाठी २९ आमदारांचे पाठबळ आवश्यक आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसचे ३, राष्ट्रवादीचे २ तर शिवसेना-भाजपचे ३ उमेदवार सहज विजयी होतील. नवव्या जागेसाठी मात्र चुरस आहे. त्यामुळे आागमी काळात होतम असलेल्या निवडणूकीत घोडेबाजार रंगणार आहे.

Leave a Comment