दोन बेपत्ता नौदल अधिकाऱ्यांचा मृत्यू, संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई- रशियन बनावटीच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीतील दोन बेपत्ता अधिकाऱ्यांचे मृतदेह आढळून आले आहेत, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. लेफ्टनंट कमांडर कपिश मुवल आणि लेफ्टनंट कमांडर मनोरंजन कुमार अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. कपिल मुवल दिल्लीचे रहिवासी असून मनोरंजन कुमार जमशेदपूर येथील आहेत. सिंधुरत्न पाणबुडीवर अपघात झाल्यानंतर काही तासांतच नौदल प्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी राजीनामा दिला होता.

केंद्र सरकारने जोशी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून जोशी यांनी राजीनामा दिला असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास मुंबई समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 50 किलोमीटर आत समुद्रात हा अपघात झाला होता. दैनंदिन सरावावर असताना हा अपघात झाल्याचे आढळून आले होते. अपघातानंतर नौदलाचे सात जवान जखमी झाले होते. त्यांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून जवळच्या नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी दोन अधिकारी बेपत्ता असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून अपघातामागचे नेमके कारण लवकरच समजणार आहे.

Leave a Comment