अलिबागमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, १० ठार

अलिबाग- तालुक्यातील कार्लेखिंड मार्गावरील भायमळा गावाजवळ ‘अनंत फायर वर्क्‍स’ या फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत १० कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत २० जण गंभीर भाजले असून त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

कार्लेखिंडपासून एक किमी अंतरावर असलेल्या भायमळा, जलपाडा गावाजवळ ‘अनंत फायर वर्क्‍स’ हा कारखाना आहे. या कारखान्यात दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक दारुगोळय़ाचा स्फोट झाला. काही कळायच्या आतच १० कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. चेहरे पूर्ण जळाल्याने मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले.

रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना घडली त्या वेळी कारखान्याचा व्यवस्थापक सुरेश बोबडे जेवणासाठी बाहेर पडल्याने तो बचावला. या कारखान्यात जवळपास ३५ कामगार काम करत होते. हा कारखाना दहिसर येथे राहणा-या आदिनाथ भगवान कांबळे यांच्या मालकीचा असल्याचे समजते.

Leave a Comment