हरभजनवरून गांगुलीची धोनीवर टीका

कोलकाता – गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाची निवड करताना निवड समिती कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मर्जीतील खेळाडूंची निवड करते. त्याऐवजी आता चांगली कामगिरी करणा-या इतर खेळाडूचाही विचार केला पाहिजे, असे मत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे. आगामी काळात टीम इंडियाचा आघाडीचा ऑफस्पिनर हरभजनसिंग पुनरागमन करू शकतो, असे मत गांगुलीने व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून हरभजन संघाबाहेर आहे. तरीही त्याला देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली आहे. यावेळी पुढे बोलताना गांगुली म्हणाला, ‘भज्जी अजूनही राष्ट्रीय संघात पुनरागमन करू शकतो. तो खेळाच्या दोन्ही स्वरूपात खेळण्यास सक्षम आहे. हरभजन अजूनही देशातला अव्वल फिरकीपटू असून, धोनीच्या मजीबाहेर जाऊन खेळाडू निवडण्याचे धाडस निवड समिती करीत नाही असे वाटते.

या मौसमात हरभजनसिंगने सहा रणजी सामन्यांत खेळताना २६.६० च्या सरासरीने २३ गडी बाद केले. इतकी चांगली कामगिरी असताना त्याची आशिया चषक किंवा वर्ल्डकप टी-२० साठी निवड न झाल्याने गांगुलीने आश्चर्य व्यक्त केले. आशिया चषक व वर्ल्डकपसाठी अमित मिश्राला दिलेली संधी गांगुलीला योग्य वाटत नाही. मिश्रा हा सरासरी दर्जाचा फिरकीपटू असून त्याचा चेंडू हवेत फिरतो व फलंदाज त्याचा अंदाज घेऊ शकतो. तो संथगतीचा गोलंदाज असून, त्याच्याविरुद्ध धावा काढणे सोपे काम आहे. त्यामुळे त्याच्या जागी हरभजनसिंग संघात हवा होता, असे गांगुलीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment