भारताबाहेरची कांही प्रसिद्ध शिवमंदिरे

आज महाशिवरात्र. महादेव म्हणजे देवांचा देव. भारतात महाशिवरात्र मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते. भाविक मोठ्या संख्येने शंकराच्या दर्शनासाठी जेथे शक्य असेल तेथील मंदिरात जातात. मात्र भारतीयांचा हा महादेव परदेशातही लोकप्रिय असून भारताबाहेर अनेक ठिकाणी शिवमंदिरे बांधली गेली आहेत आणि त्यातील कांही फारच प्रसिद्ध आहेत. अशाच कांही मंदिरांचा हा परिचय.

इंडोनेशियातील जावा बेटांवर असलले प्रंबानन शिवमंदिर हा मंदिराचा एक समूहच असून तो ९ व्या शतकात माताराम साम्राज्य असताना उभारला गेला आहे. साऊथ इस्ट आशियातले हे सर्वात मोठे मंदिर असून इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. प्रंबानन म्हणजे जावा भाषेत परब्रह्म. ब्रह्मा विष्णू आणि महेश अशी तीन देवळे येथे आहेत आणि परिसरात २४० देवळे आहेत. त्यातील बरीच आता पडली आहेत.

नेपाळच्या काठमांडूत असलेले पशुपतीनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगातील अर्धे लिंग मानले जाते. हे फार प्राचीन मंदिर असून ११ वा जयदेव राजा याने हे ७५३ एडी मध्ये बांधले होते असे संदर्भ सापडतात. १७ व्या शतकात ते पुन्हा बांधले गेले. येथील लिंग १ मीटर उंचीचे असून चारमुखी आहे. पॅगोडा स्टाईलचे हे मंदिर आहे. पाकिस्तानातील काटसराज मंदिर पंजाबच्या चकवाल येथे असून ते महाभारतकालीन आहे. अज्ञातवासात पांडवांनी येथे आश्रय घेतला होता असे संदर्भ मिळतात. शंकराची पत्नी सती येथेच मरण पावली असाही समज आहे.

श्रीलंकेतील मुन्नेश्वरम हे मंदिरही रामायण काळातील असल्याचे सांगितले जाते. येथे रावणाशी युद्ध जिंकता यावे म्हणून रामाने शंकराची उपासना केली होती. पाच मंदिरांचा हा समूह पोर्तुगीजांनी दोन वेळा नष्ट केला मात्र ही मंदिरे पुन्हा उभारली गेली. येथे शिवरात्र आणि नवरात्र हे उत्सव साजरे केले जातात. मलेशियातील जोहारबारू येथेही श्री राजा कलियम्मन याने १९२२ साली बांधलेले शिवमंदिर अतिशय भव्य आहे. सूलतान जोहारू याने ही जमीन भारतीयांना दिली होती असे संदर्भ सापडतात. सुरवातीला येथे अगदी छोटे मंदिर होते नंतर त्याचा विस्तार केला आहे. मंदिरातील काचकाम अतिशय सुंदर आहेच पण भिंतीवर ३ लाख रूद्राक्ष लावले गेले आहेत.

फिजी देशात श्री सतानत धरम शिव मंदिर आहे. मंदिराला आग लागून ते २००८ साली नष्ट झाल्याचे पोलिस सांगतात. १९०५ मध्ये  असलेले मूळचे शिवमंदिर नष्ट झाल्यानंतर तेथे १९२६ साली शिव सुब्रह्मण्यम मंदिर उभारले गेले.१९८६ ला त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. मॉरिशस यथे सागा शिवमंदिर, मस्कत येथील शिवमंदिर, रशियातील मास्कोत असलेले शिवशक्ती मंदिर अशी अन्य कांही प्रसिद्ध शिवमंदिरे आहेत.

ऑस्ट्रेलियातील सिडनीचे उपनगर असलेल्या मिटोतील मुक्ती गुप्तेश्वर शिवमंदिर विशेष माहिती घेण्यासारखे आहे. यातील लिंग हे १३ वे ज्योतिर्लिंग असून ते ऑगस्ट १९९९ मध्ये नेपाळचा राजा विरेंद्रवीर विक्रम शाहदेव याने सर्पाचा तोंडाचा आकार असलेला देश म्हणून ऑस्ट्रेलियाला दिले असे सांगितले जाते. हे गुहेतील मंदिर आहे. मेलबर्न येथेही शिवविष्णू मंदिर असून हे हिंदू सोसायटी, व्हीक्टोरिया यांनी बांधले आहे.

न्यूझीलंड ऑकलंड येथे सनातन शिवचरण ट्रस्टने २००४ साली शिवमंदिर उभारले आहे. अमेरिकेतील लिव्हरमोर येथे प्रचंड मोठे शिवविष्णू मंदिर असून यातील मूर्ती तमीळनाडू सरकारने भेट म्हणून दिल्या आहेत. या मंदिराला गोपुरम आहेत. युरोपमध्ये स्वित्झरलंडमधील झुरीच येथेही गर्भगृहासह असलेले शिवमंदिर असून शिवलिंगाच्या मागे नटराज आणि शक्ती यांच्या मूर्ती आहेत. येथे दोन नंदी आहेत. येथेही शिवरात्र साजरी केली जाते. अर्मस्टरडॅम येथे जून २०११ मध्ये शिवमंदिर बांधले गेले असून येथील शिवलिंग पंचमुखी आहे. दक्षिण आफ्रिकेतील दर्बन येथेही मोठे शिवमंदिर आहे.