भारतात स्मार्टफोन विक्रीत तिप्पट वाढ

मुंबई – गेल्या वर्षात भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत तिप्पट वाढ झाली असून गेल्या वर्षात ४ कोटी ४० लाखापेक्षा अधिक स्मार्टफोन विकले गेले आहेत. आयडीसी फर्मच्या म्हणण्यानुसार मायक्रोमॅक्स, कार्बन सारख्या स्वदेशी व स्वस्त स्मार्टफोनचा विक्री वाढीत मोठाच हातभार लागला आहे.

२०१२ सालात भारतात १ कोटी ६२ लाख स्मार्टफोन विकले गेले होते ते गतवर्षी ४.४ कोटींवर गेले आहेत.२०१३ सालात भारताने सर्वात वेगाने स्मार्टफोन विक्री होणारा देश म्हणून विक्रम केला आहे. भारतातील स्मार्टफोनची बाजारपेठ वेगाने वाढत असल्याने स्वदेशी कंपन्यांनी सहज परवडणार्‍या किमतीत स्मार्टफोन सादर केले आहेत. त्यातून फिचर फोन आणि स्मार्टफोनमधील किमतीची दरीही लक्षणीय रित्या कमी झाल्याने स्मार्टफोनला ग्राहक अधिक पसंती देत आहेत. २०१३ च्या चौथ्या तिमाहीत कोरियाच्या सॅमसंगचा हिस्सा ३८ टक्के असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. त्या पाठोपाठ मायक्रोमॅकस १६ टक्के, कार्बन १० टक्के, सोनी ५ टक्के, लावा ४.७ टक्के असा हिस्सा आहे.

गेल्या वर्षात भारतात एकूण फोन विक्री २५.७ कोटी युनिट इतकी नोंदली गेली आहे.