नायजेरियात दहशतवादी हल्ला, ५९ विद्यार्थ्यांची हत्या

दामातुरु – नायजेरियातील दामातुरु शहरातील फेडरल गर्व्हमेंट महाविद्यालयाच्या वसतिगृहावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ५९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. बोको हरम या इस्लामी दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवाद्याने हल्ला करुन, ५९ विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या केली. या दहशतवाद्याने प्रथम बेछूट गोळीबार केला नंतर हे वसतिगृह पेटवून दिले. काही विद्यार्थ्यांचा गोळया लागून मृत्यू झाला तर, अनेक विद्यार्थ्यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. अनेक विद्यार्थ्यांच्या मृतदेहाची राख झाली होती असे दामातारुचे पोलिस आयुक्त सॅनयुसी रुफाई यांनी सांगितले. अत्यंत निदर्यतेने या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सरकारी अधिकाºयांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून उत्तर नायजेरियामध्ये बोको हरमकडून रक्तपात सुरू आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात मामुडो गावातील शाळेवर हल्ला करुन २२ विद्यार्थ्यांची हत्या केली होती. महिन्याभरात बोकोहरमने ३०० जणांची हत्या केली आहे. यात बहुतांश नागरिक आहेत. गेल्या आठवडयात दोन वेगवेगळया दहशतवादी हल्ल्यांमध्ये २०० नागरिकांचा मृत्यू झाला होता.