कलमाडींवर फौजदारी खटला दाखल होणार

पुणे – पुण्याचे माजी खासदार आणि भारतीय ऑलिंपिक समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यावर पुण्यात आक्टोबर २००८ साली झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेत पैशांचे गैरव्यवहार केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल करण्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सशर्त मंजुरी दिली असल्याचे वृत्त आहे.

या संदर्भात वरीष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धात ३२ कोटी ९५ लाख रूपये खर्चाचा हिशोब आणि तपशील कलमाडी यांनी दिलेला नाही. तो जर त्यांनी पंधरा दिवसांत दिला नाही तर त्यांच्यावर गुन्हेगारी खटला दाखल करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सीसीटिव्ही बसविण्यासाठी येणार्‍या खर्चापेक्षा ३३ कोटी रक्कम जादा दिली गेली असून त्यापैकी २५.१२ कोटी रूपये क्रिडा युवा निर्देशकांमार्फतच दिले गेले होते. विशेष म्हणजे सीसीटिव्ही बसविलेच गेले नव्हते.

स्पर्धेसाठी येणार्‍या खेळाडूंच्या निवासासाठी १ हॉटेल बांधण्यात येणार होते त्याऐवजी दोन हॉटेल बांधली गेली मात्र त्याच्या खर्चाचा तपशील अथवा बिले सादर केली गेलेली नाहीत. हा सर्व पैसा राष्ट्रीयीकृत बँकाकडून दिला गेला होता मात्र तो कुठून आला याचा कोणताही खुलासा केला गेलेला नाही असे समजते. यामुळे येत्या १५ दिवसांत बिले सादर न केल्यास कलमाडी यांच्यावर फौजदारी दावा दाखल केला जाईल.

Leave a Comment